सिराजला दंड, ऍडलेड कसोटी वादानंतर ‘आयसीसी’ची कारवाई

हिंदुस्थानचा वेगवान गोलंदाज मोहम्मद सिराज आणि ऑस्ट्रेलियन फलंदाज ट्रव्हिस हेड यांच्यात ऍडलेड कसोटीत झालेल्या जोरदार वादामुळे क्रिकेटविश्वात खळबळ उडाली आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेनेही (आयसीसी) या घटनेची गंभीर दखल घेतली असून, दोन्ही खेळाडूंना 1-1 टिमेरिट पॉइंट दिलाय. याचबरोबर मोहम्मद सिराजवर सामन्यातील 20 टक्के रक्कम कापून दंडात्मक कारवाई केली आहे.

मागील 24 महिन्यांत दोन्ही खेळाडूंची ही पहिलीच चूक असल्याने त्यांच्यावर एका सामन्याची बंदी घालण्याची कारवाई ‘आयसीसी’ने केली नाही. ही दुर्दैवी घटना ऍडलेड कसोटीत घडली, जेव्हा मोहम्मद सिराजने ऑस्ट्रेलियाच्या पहिल्या डावाच्या 82व्या षटकात ट्रव्हिस हेडला क्लीन बोल्ड केले. विकेट घेतल्यानंतर सिराजने प्रेक्षकांकडे बोट दाखवत सेलिब्रेशन केले. हेडला ही कृती आवडली नाही आणि तो सिराजला काहीतरी बोलला. यानंतर हेड पॅव्हेलियनमध्ये परतला असला तरी ऑस्ट्रेलियन प्रेक्षकांनी सिराजच्या कृतीवर नाराजी व्यक्त केली.

सिराजचा गैरसमज झाला!

दुसऱ्या दिवसाचा खेळ संपल्यानंतर ट्रव्हिस हेड म्हणाला होता की, मी सिराजला ‘वेल बोल्ड’ असे म्हणालो होतो, पण त्याने याचा काहीतरी वेगळाच अर्थ घेतला. ते पाहून मी थोडा निराश झालो. जर त्याला असे वागायचे असेल आणि स्वतःला जगासमोर असे दाखवायचे असेल तर ठीक आहे.

हेड आता खोटं बोलतोय!

मोहम्मद सिराजने ट्रव्हिस हेडचे विधान पूर्णपणे फेटाळून लावले. स्टार स्पोर्ट्सशी बोलताना सिराज म्हणाला, ‘बळी टिपल्यानंतर मी सेलिब्रेशन करत होतो; पण ट्रव्हिस हेडने माझ्याबद्दल वाईट शब्द वापरले, जे टीव्हीवरही स्पष्ट दिसत होते. क्रिकेट हा सभ्यगृहस्थांचा खेळ आहे आणि आम्ही सर्वांचा आदर करतो. पण त्याने जे केले ते बरोबर नव्हते.’