हिंदुस्थान पाकिस्तान आज न्यूयॉर्कमध्ये भिडणार

टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपच्या इतिहासात हिंदुस्थान-पाकिस्तान दरम्यान 7 सामने झाले आहेत. यात हिंदुस्थानने 6, तर पाकिस्तानने एक सामना जिंकलेला आहे. उभय संघांनी एकएकदा वर्ल्ड कपच्या झळाळत्या करंडकावर नाव कोरलेले आहे. यावेळी ‘टीम इंडिया’ला जेतेपदाचे प्रबळ दावेदार मानले जात आहे.

हिंदुस्थान-पाकिस्तान या पारंपरिक कट्टर दोन क्रिकेटवेडय़ा देशांमधील क्रिकेटची मॅच म्हणजे उभय संघांसाठी ‘हारना मना है’ अशी असते. जबरदस्त टेन्शन… खुन्नस… थरार… राडा… शाब्दिक खडाजंगी… जिंकलो तर महाजल्लोष अन् हरलो तर शिव्यांची लाखोली… आणि असं बरंच काही घडत असतं. या पारंपरिक प्रतिस्पर्ध्यांना अन् त्यांच्या चाहत्यांना एकमेकांविरुद्धचा पराभव पचवायला अवघड असतो, हे सर्वश्रुत आहे. त्यामुळे उभय संघांतील फलंदाजांच्या तळपत्या तलवारी अन् गोलंदाजांच्या मुलुखमैदानी तोफा लढाईसाठी सज्ज झाल्या आहेत. त्यामुळे टी-20 वर्ल्ड कपमधील हा क्रिकेट‘वॉर’चा थरार अन् टेन्शन अनुभवण्यासाठी उद्या रविवार, 9 जून रोजी रात्री 8 वाजेपर्यंत (हिंदुस्थानी प्रमाणवेळेनुसार) आपापली कामे उरकून तुम्हीही सज्ज व्हा. तिकडे न्यूयॉर्कमध्ये मात्र हा सामना सकाळी 10:30 वाजता सुरू होणार आहे.

पाकिस्तानवर कमालीचे दडपण

रोहित शर्माच्या नेतृत्वाखालील ‘टीम इंडिया’ने आयर्लंडचा धुव्वा उडवून आपल्या टी-20 वर्ल्ड कपच्या अभियानास धडाकेबाज  प्रारंभ केलाय. दुसरीकडे सुपर ओव्हरपर्यंत ताणलेल्या सलामीच्या लढतीत पाकिस्तानला यजमान अमेरिकेने पराभवाचा धक्का दिलाय. या अनपेक्षित पराभवामुळे पाकिस्तानी संघ गर्भगळीत झाला असल्याने हिंदुस्थानविरुद्ध होणाऱ्या उद्याच्या गट फेरीच्या लढतीत पाकिस्तानी खेळाडूंवर कमालीचे दडपण असेल. कारण हिंदुस्थानविरुद्धच्या पराभवामुळे त्यांची सुपर-8 फेरीतील वाट नक्कीच अवघड होणार आहे.

तोडीस तोड खेळाडू

हिंदुस्थान-पाकिस्तान हे क्रिकेटविश्वातील तुल्यबळ संघ होय. हिंदुस्थानकडे रोहित शर्मा, विराट कोहली, सूर्यकुमार यादव, ऋषभ पंत, हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा व कुलदीप यादव अशी खोलवर फलंदाजी आहे. दुसरीकडे पाकिस्तानकडेही मोहम्मद रिजवान,  बाबर आजम, उस्मान खान, फखर जमान, आजम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी असा तोलामोलाचा फलंदाजीक्रम आहे. उभय संघांचा गोलंदाजी ताफाही तोडीस तोड आहे. हिंदुस्थानकडे जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह व हार्दिक पंडय़ा असा वेगवान ताफा असेल. रवींद्र जाडेजा व कुलदीप यादव अशी फिरकीची जोडगोळीही हिंदुस्थानच्या मदतीला असेल. पाकिस्तानकडेही शाहीन शाह आफ्रिदी, मोहम्मद आमीर, हारिस रऊफ, नसीम शाह असा जबरदस्त गोलंदाजी ताफा आहे. या गोलंदाजी ताफ्याविरुद्ध हिंदुस्थानच्या फलंदाजांना खूपच सावध खेळ करावा लागणार आहे. याचबरोबर हिंदुस्थानच्या वैविध्यतेने नटलेल्या गोलंदाजीला सामोरे जाताना पाकिस्तानी फलंदाजीचाही तितकाच कस लागणार आहे. त्यामुळे उद्याच्या क्रिकेट‘वॉर’मध्ये कोण बाजी मारणार याकडे केवळ हिंदुस्थान, पाकिस्तानच नव्हे, तर अवघ्या क्रिकेटविश्वाचे लक्ष असणार आहे.

हिंदुस्थानः रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, संजू सॅमसन, सूर्यकुमार यादव, शिवम दुबे, ऋषभ पंत (यष्टिरक्षक), हार्दिक पंडय़ा, रवींद्र जाडेजा, कुलदीप यादव, जसप्रीत बुमराह, अर्शदीप सिंह.

पाकिस्तानः मोहम्मद रिजवान (यष्टिरक्षक), बाबर आजम (कर्णधार), उस्मान खान, फखर जमान, आजम खान, इफ्तिखार अहमद, शादाब खान, शाहीन शाह आफ्रिदी, हारिस रऊफ/मोहम्मद आमीर, नसीम शाह, अब्रार अहमद.

आजची फटकेबाजी

वेस्ट इंडीज- युगांडा  06:00

हिंदुस्थान- पाकिस्तान  20:00

ओमान – स्कॉटलंड 22:30

पावसाचा फटका?

हिंदुस्थान-पाकिस्तानदरम्यानचा गटफेरीतील बहुचर्चित टी-20 सामना सुरू होण्यास आता काही तासच शिल्लक आहेत. मात्र या सामन्यात खेळपट्टीबरोबर हवामानाची भूमिका तेवढीच महत्त्वाची ठरणार आहे. कारण वेधशाळेने सामन्यादरम्यान पावसाची शक्यता वर्तवली आहे. सामना रद्द झाल्यास उभय संघांना 1-1 गुण विभागून देण्यात येईल. मात्र सामना रद्द झाल्यास क्रिकेटप्रेमींचा तर हिरमोड होईलच, पण आर्थिक गणितालाही मोठा फटका बसणार आहे.