चॅम्पियन्स ट्रॉफीचा पीओके दौरा रद्द

आधीच हिंदुस्थानी क्रिकेट संघाने आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानचा दौरा करण्यास नकार दर्शवल्यामुळे पाकिस्तानी क्रिकेट मंडळाच्या (पीसीबी) पायाखालची जमीन सरकलीय. असे असतानाही उभय देशांमधील वातावरणात तणाव निर्माण करताना चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाशी काहीही संबंध नसलेल्या पाकव्याप्त कश्मीरच्या भागांमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफीचा दौरा आयोजित करण्याचा पराक्रम केला. पीसीबीचा हा कार्यक्रम जाहीर होताच हिंदुस्थानी क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) आक्षेप घेत आयसीसीकडे तक्रार केली. आयसीसीनेही या दौऱ्याबाबत गांभीर्याने दखल घेत पीओके दौऱ्यास नकार दर्शवला आहे. त्यामुळे शनिवारी 16 नोव्हेंबरला पाकव्याप्त कश्मीरच्या स्कार्दू, मर्री, हुंजा आणि मुझफ्फराबाद येथून जाणारा ट्रॉफीचा दौरा रद्द करण्यात आला आहे.

आगामी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानात खेळण्यास हिंदुस्थानी संघाने नकार दर्शवल्यामुळे या आयोजनाबाबत अद्याप अंतिम निर्णय होऊ शकलेला नाही. तरीही पाकिस्तानने स्पर्धा आयोजनाला सुरुवात केली आहे. पाकिस्तानात स्पर्धेचे वातावरण निर्माण व्हावे म्हणून चॅम्पियन्स ट्रॉफीची यात्रा शनिवारपासून इस्लामाबाद येथून सुरू केली जाणार होती. ही स्पर्धा लाहोर, रावळपिंडी आणि कराची या तीन शहरातच खेळविली जाणार आहे, पण या स्पर्धा आयोजनाला राजकीय रंग देताना ट्रॉफीचा दौरा पाकव्याप्त कश्मीरमधून सुरू करण्याचे पीसीबीने ठरवले. नेमक्या याच निर्णयाची बीसीसीआयने निंदा केली आहे. विभागीय अखंडता आणि खेळांमध्ये राजकीय हस्तक्षेपाबाबत चिंता व्यक्त करत बीसीसीआय सचिव जय शहा यांनी आयसीसीकडे योग्य कारवाईची मागणी केली होती आणि आयसीसीने याप्रकरणी तत्काळ दखल घेत हा ट्रॉफीचा दौरा रद्द करण्याच्या सूचना पीसीबीला दिल्या.

हिंदुस्थानला कसली भीती?

जर पाकिस्तानच्या दौऱ्यावर ऑस्ट्रेलिया, इंग्लंड, न्यूझीलंड हे दिग्गज संघ येत असतील तर हिंदुस्थानी संघाला नेमकी कसली भीती वाटतेय? पीसीबीने आयसीसीकडे हिंदुस्थानच्या नकाराचे कारण विचारले असून सुरक्षेच्या कारणास्तवच हिंदुस्थान पाकिस्तान दौऱ्यावर जाणार नसल्याचे कारण समोर आले आहे. गेल्या वर्षी पाकिस्तानी संघ वन डे वर्ल्ड कपसाठी हिंदुस्थानात सामने खेळला होता आणि उभय संघातील सामनाच वर्ल्ड कपमधील सर्वाधिक पाहिला गेलेला आणि सर्वाधिक प्रेक्षक संख्येचा सामना होता. याच बाबींवर पीसीबीने पाकिस्तानी सरकारलाही याप्रकरणी आपली भूमिका मांडण्याची भावना व्यक्त केली आहे.

चॅम्पियन्स ट्रॉफी आयोजनाची चिंता वाढली

हिंदुस्थानने पाकिस्तानात जाऊन खेळण्यास नकार दिल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन सर्वच दृष्टीने संकटात सापडले आहे. त्यातच ट्रॉफीचा दौरा पीओके म्हणून काढण्याचा कार्यक्रम जाहीर करून पीसीबीने हे प्रकरण आणखी गंभीर केलेय. त्यामुळे स्पर्धेतील हिंदुस्थानचा सहभागाचा आणि स्पर्धा आयोजनाचा सस्पेन्स अजून वाढला आहे.

तर हिंदुस्थानशिवाय चॅम्पियन्स ट्रॉफी

चॅम्पियन्स ट्रॉफी हिंदुस्थानशिवायही होऊ शकते, पण असे झाल्यास पीसीबीच नव्हे तर आयसीसीलाही याचा प्रचंड मोठा आर्थिक भुर्दंड बसू शकतो. हिंदुस्थानला पाकिस्तानात खेळायचे नाहीय तर पीसीबीला हिंदुस्थानचे सामने हायब्रिड मॉडेलनुसार खेळवायचे नाहीत. या दोघांच्या ताठर भूमिकेनंतर आयसीसीला हिंदुस्थानी संघाला स्पर्धेबाहेर करत जागतिक क्रमवारीत नवव्या स्थानावर असलेल्या संघाला स्पर्धेत स्थान द्यावे लागेल. तसेच स्पर्धेचे आर्थिक नुकसान पाहता आयसीसी पीसीबीकडून यजमानपदही काढू शकते किंवा पीसीबीसुद्धा स्पर्धेतून माघार घेऊ शकते. सद्यस्थितीला नेमके काय घडेल, हे सांगता येत नाही.