ICC ने Men’s T20 Cricketer Of The Year साठी नामांकित खेळाडूंची नावे जाहीर केली आहेत. या खेळाडूंमध्ये हिंदुस्थान, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि झम्बाब्वेच्या प्रत्येकी एका खेळाडूचा समावेश आहे. मात्र या खेळाडूंच्या यादीमध्ये टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज जसप्रीत बुमराहच्या नावाचा समावेश करण्यात आलेला नाही. त्यामुळे चाहत्यांच्या भुवया उंचावल्या आहेत.
जसप्रीत बुमराह व्यतिरिक्त अर्शदिप सिंगने टी20 क्रिकेटमध्ये धारधार गोलंदाजी करत सर्वांना प्रभावित केले आहे. विशेष बाब म्हणजे 2024 या वर्षामध्ये अर्शदिप सिंग टीम इंडियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 18 सामन्यांमध्ये 13.5 च्या सरासरीने 36 फलंदाजांना तंबुचा रस्ता दाखवला आहे. त्याच बरोबर टी20 वर्ल्ड कपमध्ये सुद्धा त्याच्या गोलंदाजीची धार संघाच्या पथ्यावर पडली. फायनलमध्ये त्याने 19 व्या षटकात दिलेल्या 4 धावा निर्णायक ठरल्या. त्याच्या या धुवाँधार खेळामुळे ICC ने त्याचे नाव टी20 क्रिकेटर ऑफ द इयरसाठी नामांकित केले आहे.
झिम्बाब्वेचा अष्टपैलू खेळाडू सिकंदर रजा आणि ऑस्ट्रेलियाचा विस्फोटक फंलदाज ट्रेव्हिस हेड यांचे नाव सुद्धा आयसीसीने नामांकित केले आहे. सिकंदर रजाने 2024 मध्ये 24 टी20 सामने खेळले असून 573 धावा केल्या आहेत. त्याच बरोबर 24 विकेट त्याच्या नावावर असून एकाच सामन्यात 5 विकेट घेण्याचा पराक्रम सुद्धा त्याने केला आहे. ऑस्ट्रेलियाच्या ट्रेव्हिस हेडने 15 टी20 सामन्यांमध्ये 38.5 च्या सरासरीने 539 धावा केल्या आहेत. विशेष बाब म्हणजे टी20 वर्ल्ड कप 2024 मध्ये ट्रेव्हिस हेड सर्वाधिक धावा करणारा तिसरा फलंदाज होता.
पाकिस्तानच्या बाबर आजमचे नाव टी20 क्रिकेटर ऑफ द इयर साठी नामांकित करण्यात आले आहे. 2024 या वर्षामध्ये त्याने टी20 क्रिकेटमध्ये चांगला खेळ केला आहे. 24 सामन्यांमध्ये त्याने 33.54 च्या सरासरीने 738 धावा केल्या आहेत. यामध्ये 6 अर्धशतके आणि 4 शतकांचा समावेश आहे. त्याच बरोबर टी20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावांचा विक्रम नावावर करण्यासाठी त्याला फक्त 8 धावांची गरज आहे. सध्या रोहित शर्मा (4231 धावा) या बाबतीत पहिल्या क्रमांकावर आहे.