गाझा आणि लेबनॉनमध्ये दोन आघाड्यांवर युद्ध लढणाऱ्या इस्रायलला आंतरराष्ट्रीय गुन्हेगारी न्यायालयाने (ICC) मोठा धक्का दिला आहे. आंतरराष्ट्रीय न्यायालयाने इस्रायलचे पंतप्रधान बेंजामिन नेतन्याहू यांच्याविरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. गेल्या काही काळापासून न्यायालयात नेतन्याहू यांच्याविरोधातील खटल्यांची सुनावणी सुरू होती. गुरुवारी आपल्या आदेशात न्यायालयाने म्हटले की, नेतन्याहू आणि इस्रायलचे संरक्षण मंत्री योव गॅलंट यांच्याविरुद्ध मानवतेविरुद्धचे गुन्हे आणि युद्ध गुन्ह्यांसाठी अटक वॉरंट जारी केले आहे.
याप्रकरणी सुनावणी करताना आयसीसीने म्हटले आहे की, ”हमासचा खात्मा करण्याच्या नावाखाली इस्रायली सैन्य निरपराधांना मारत आहे आणि त्यांना मरायला सोडत आहे.” स्थानिक प्रसारमाध्यमांनी दिलेल्या माहितीनुसार, इस्रायलच्या हल्ल्यात सुमारे 44 हजार गाझान लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. मात्र त्यात हमासचे दहशतवादी आणि सामान्य लोकांची वेगळी संख्या नमूद केलेली नाही.
नेतन्याहूंना खरंच होणार अटक?
आयसीसीच्या या कारवाईचा स्पष्ट अर्थ असा आहे की, जर नेतन्याहू आणि गॅलेंट आयसीसी सदस्य देशांमध्ये प्रवास करत असतील तर त्या देशांना त्यांना अटक करावी लागेल. सध्या आयसीसी सदस्य देशांची संख्या 124 आहे. याआधी आयसीसीने रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांच्या विरोधात अटक वॉरंट जारी केले आहे. पुतीन यांच्यावर युक्रेनमध्ये नासधूस केल्याचा आणि लाखो लोकांची हत्या केल्याचा आरोप आहे. पुतीन यांचे सैन्य फेब्रुवारी 2022 पासून युक्रेनमध्ये युद्ध लढत आहे.