
एकदिवसीय क्रिकेटमध्ये दोन चेंडूंचा नियम हा घातक आहे. हा नियम खेळासाठी हानिकारक आहे. रिव्हर्स स्विंग एक विशिष्ट प्रकारचे कौशल्य आहे. मात्र, दोन नव्या चेंडूंमुळे रिव्हर्स स्विंग करण्यासाठी चेंडू पुरेसा जुना होणार नाही, असे परखड मत मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने व्यक्त केले आहे.
आयसीसी क्रिकेटच्या काही नियमांमध्ये बदल करायचा विचार करत असून, त्यामुळे गोलंदाजांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे. एकदिवसीय क्रिकेटमध्ये वापरल्या जाणाऱ्या दोन चेंडूंच्या नियमांमध्ये बदल करण्याच्या तयारीत आहे. या बदलामुळे गोलंदाजांना पुन्हा एकदा रिव्हर्स स्विंगचा फायदा मिळण्याची शक्यता आहे. या बदलानुसार 25 षटकांनंतर इनिंग संपेपर्यंत या दोन चेंडूंपैकी एका चेंडूची निवड करावी लागेल. सध्या वन डे क्रिकेटमध्ये 2 चेंडू वापरण्यात येत असल्यामुळे खेळातून रिव्हर्स स्विंग गायब झाला आहे. शिवाय कसोटी क्रिकेटमधला ओव्हर रेट नियंत्रित करण्यासाठी नवीन नियम आणले जाणार आहे.
दोन चेंडूंच्या नियमावर सुरूवातीपासूनच मोठ्या प्रमाणावर टीका झाली आहे. सचिन तेंडुलकरने देखील हा नियम हानिकारक असल्याचं म्हटलं होतं. ऑस्ट्रेलियाचा माजी वेगवान गोलंदाज ब्रेट लीनेही सचिनच्या या भूमिकेचं समर्थन केले आहे.
कसोटी क्रिकेटसाठी काऊंटडाऊन घड्याळ
कसोटी क्रिकेटमध्ये काऊंटडाऊन घड्याळाचा वापर करण्याबाबतची आयसीसीच्या बैठकीत विचार केला जाण्याची शक्यता आहे. वनडे आणि टी-20 क्रिकेटमध्ये काऊंटडाऊनचं घड्याळ आधीच वापरलं जात आहे. आता टेस्ट क्रिकेटमध्येही हे घड्याळ वापरलं तर दिवसाला 90 ओव्हर टाकणं बंधनकारक होईल.