बाप रे… वर्ल्ड कपमुळे 11,637 कोटींची कमाई, आयसीसीने दिली छप्पर फाडके माहिती

गेल्या वर्षी ऑक्टोबर-नोव्हेंबरदरम्यान झालेल्या आयसीसी क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये हिंदुस्थानी संघाला जगज्जेतेपद पटकावता आले नसले तरी आयोजनामुळे बीसीसीआयने 11,637 कोटींची छप्पर फाडके कमाई केल्याची माहिती आयसीसीने दिली. एवढेच नव्हे तर सर्वच दृष्टिकोनातून हा वर्ल्ड कप आयसीसीचे आजवरचे सर्वात मोठे वर्ल्ड कप आयोजन ठरले आहे. या कमाईत सर्वात मोठा वाटा पर्यटन विभागाचा झाल्याची माहिती आयसीसीने दिली.

गेल्या वर्षाच्या अखेरीस आयसीसीच्या क्रिकेट वर्ल्ड कप आयोजनात आर्थिक शक्तीचे भव्य प्रदर्शन करण्यात आले, ज्यात हिंदुस्थानने 1.39 अब्ज डॉलर्स म्हणजेच 11,637 कोटी रुपये इतके प्रचंड उत्पन्न कमावले आहे. या स्पर्धेत ऑस्ट्रेलियाने सहाव्यांदा जगज्जेतेपदाचा मान पटकावताना हिंदुस्थानचे तिसरे जेतेपदाचे स्वप्न भंग केले.

वर्ल्ड कप आयोजनाच्या निमित्ताने हिंदुस्थानच्या पर्यटनासाठी मोठ्या संख्येने परदेशी पर्यटक हिंदुस्थानात आले. त्यामुळे पर्यटन विभागाला 86.14 कोटी डॉलर्सचा महसूल गोळा करता आला. यात निवास, प्रवास आणि खाद्य आणि पेय या गोष्टींचा समावेश आहे. मात्र आयसीसीने अहवालात जे आकडे जाहीर केले आहेत तो एकूण महसूल आहे की उलाढाल हे स्पष्ट केले नाही.

12.50 लाख प्रेक्षकांची उपस्थिती

हिंदुस्थानात आयोजित झालेल्या वर्ल्ड कपदरम्यान तब्बल 12.50 लाख प्रेक्षकांनी स्टेडियममध्ये जाऊन सामने पाहिले. एका वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक प्रेक्षकांचा हा नवा विक्रम प्रस्थापित झाला आहे. त्याचबरोबर अहमदाबादच्या मोदी स्टेडियमवर झालेल्या हिंदुस्थान-पाकिस्तान आणि अंतिम सामन्यासाठी एक लाखापेक्षा अधिक प्रेक्षकांची उपस्थिती लाभली होती. वर्ल्ड कपच्या 12.50 लाख प्रेक्षक उपस्थितीच्या 75 टक्के प्रेक्षकांना प्रथमच वर्ल्ड कपचे सामने पाहिले. तसेच या स्पर्धेसाठी परदेशात आलेल्या क्रिकेटप्रेमींपैकी 55 टक्के नियमित हिंदुस्थानात येतात, अशीही माहिती आयसीसीच्या अहवालात देण्यात आली आहे. तसेच वर्ल्ड कपच्या निमित्ताने 19 टक्के परदेशी पर्यटकांनी पहिल्यांदाच हिंदुस्थानचा दौरा केला.

आयसीसीने आपल्या अहवालात वर्ल्ड कपचे सामने पाहण्यासाठी आलेल्या हजारो प्रेक्षकांनी पर्यटक स्थळांनाही भेट दिली, ज्यामुळे 28.12 कोटी डॉलर्सची उलाढाल झाली आणि त्यापैकी 68 टक्के प्रेक्षकांनी आपण भविष्यात आपल्या कुटुंबीयांना आणि मित्रपरिवारालाही हिंदुस्थानचा दौरा करण्याची शिफारस करणार असल्याचे सांगितले. याचबरोबर या वर्ल्ड कप आयोजनामुळे तब्बल 48 हजार पूर्णवेळ आणि हंगामी नोकऱ्याही उपलब्ध झाल्या होत्या.