
आधी हिंदुस्थानचा पाकिस्तानात न खेळण्याचा निर्णय, मग हायब्रीड मॉडेल अंमलबजावणीसाठी झालेले वाकयुद्ध, त्यानंतर स्टेडियम पुननिर्माणासाठी झालेल्या विलंबामुळे स्पर्धा आयोजनावर आलेली टांगती तलवार, असे अनेक अडथळे पार पाडल्यानंतर अखेर आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी क्रिकेटविश्वातील अव्वल आठ संघांचे चॅम्पियन्स युद्ध सुरू होतेय. यजमान आणि गतविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्यातील लढतीने क्रिकेटविश्वातील प्रतिष्ठित स्पर्धेचे आठ वर्षांनंतर पुन्हा एकदा कमबॅक होतेय. स्पर्धा चॅम्पियन्सची असली तरी स्पर्धेआधीच खरे चॅम्पियन्स दुखापतीमुळे स्पर्धेबाहेर गेलेत. त्यामुळे चॅम्पियन्सविना चॅम्पियन्स ट्रॉफीचा खेळ कसा रंगतोय याकडे साऱ्यांचा नजरा खिळल्या आहेत.
2017 साली आयसीसीची अखेरची चॅम्पियन्स स्पर्धा झाली होती आणि या स्पर्धेत पाकिस्तानने अंतिम सामन्यात हिंदुस्थानला नमवत आपण चॅम्पियन्स असल्याचे अवघ्या जगाला दाखवून दिले होते. ती स्पर्धाच अखेरची चॅम्पियन्स ट्रॉफी मानली जात होती. मात्र आयसीसीने वन डे फॉरमॅटच्या या नॉकआऊट स्पर्धेला पुन्हा सुरू करण्याचा निर्णय घेत स्पर्धेचे पुनरुज्जीवन केले. एकदिवसीय क्रिकेट विश्वातील अव्वल आठ संघ यात खेळत असून श्रीलंका, वेस्ट इंडीजसारखे जगज्जेते संघ या स्पर्धेसाठी पात्र ठरू शकलेले नाहीत.
अफगाणिस्तान डार्क हॉर्स
माजी जगज्जेते श्रीलंका आणि विंडीज हे संघ चॅम्पियन्स ट्रॉफीत स्थान मिळवू शकले नसले तरी गेल्या काही वर्षांत जोरदार कामगिरी करणाऱ्या अफगाणिस्तानने या स्पर्धेत एण्ट्री केली आहे. हा संघ प्रथमच चॅम्पियन्स ट्रॉफीत खेळतोय आणि त्यांच्या जोरदार कामगिरीमुळे ते थेट स्पर्धेचे डार्क हॉर्स बनले आहेत. संभाव्य विजेत्यांच्या यादीत त्यांच्याही नावाचा उल्लेख आहे. ‘ब’ गटातून बाद फेरीत स्थान मिळवणाऱ्या संघांत ते टॉपवर आहेत. या गटात दक्षिण आफ्रिका, इंग्लंड हे तगडे संघ असले तरी सध्या अफगाणिस्तानचा खेळ त्यांच्यापेक्षा सरस होतोय.
पॉवर प्ले 12 षटकांचा
चॅम्पियन्स ट्रॉफीचा थरार वाढावा म्हणून आयसीसीने पॉवर प्ले 10 ऐवजी 12 षटकांचा केला आहे. तसेच फ्लोटिंग पॉवर प्लेचा वापर 30 ते 40 षटकांदरम्यान कधीही केला जाऊ शकतो. आयसीसीने हा नियम स्पर्धेपुरताच लागू केला आहे. मात्र या नियमाचा लाभ उठवत प्रत्येक सामन्यातील सांघिक धावसंख्या 300-350 च्या दरम्यान असेल, असा अंदाज वर्तवला जात आहे.
चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे आरपार स्पर्धा
चॅम्पियन्स ट्रॉफी म्हणजे एक आरपार स्पर्धा. यात नेमकी कुणाची लॉटरी लागेल? काहीच सांगता येत नाही. गेल्या दोन आठवड्यात झालेल्या एकदिवसीय सामन्याने तर सारे अंदाजच बिघडवले आहेत. एकीकडे जगज्जेत्या ऑस्ट्रेलियाचा कागदावर दुबळ्या भासणाऱ्या श्रीलंकेने 2-0 असा धुव्वा उडवला. याचे अवघ्या जगाने आश्चर्य व्यक्त केलेय. दुसरीकडे न्यूझीलंडने तिरंगी मालिकेत विजयाची हॅटट्रिक नोंदवत पुन्हा एकदा जोरदार कामगिरी करून दाखवलीय. त्याचबरोबर हिंदुस्थानने इंग्लंडविरुद्धच्या मालिकेत विजयाची हॅटट्रिक साजरी करत चॅम्पियन्स ट्रॉफी उंचावण्यासाठी सज्ज असल्याचे दाखवून दिलेय. खरं सांगायचं तर चॅम्पियन्स ट्रॉफीआधी काहींनी कठीण पेपर सहज सोडवले तर काहींना सोप्पा पेपर सोडवणेही जमलेले नाही. त्यामुळे या परीक्षेत कुणाला पेपर सोप्पा येईल आणि कुणाला कठीण, याची कुणालाही कल्पना नसल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी उत्पंठावर्धक होईल, अशी अपेक्षा आहे.
प्रथमच आयसीसीची हायब्रीड स्पर्धा
हिंदुस्थानी संघाने सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानात खेळण्यास नकार दर्शवल्यामुळे आयसीसीची चॅम्पियन्स ट्रॉफी प्रथमच हायब्रीड मॉडेलनुसार खेळविली जाणार आहे. त्यानुसार हिंदुस्थान आपल्या सर्व साखळी लढती दुबईत खेळेल. तर अन्य संघ आपल्या सर्व लढती पाकिस्तानातील कराची, लाहोर आणि रावळपिंडी या शहरात खेळेल. तसेच स्पर्धेतील एक उपांत्य सामना दुबई तर दुसरा लाहोरमध्ये खेळविला जाणार आहे. जर हिंदुस्थानचा संघ अंतिम फेरीत पोहोचला तर तो सामनाही दुबईतच खेळला जाईल, मात्र हिंदुस्थानचे आव्हान उपांत्य फेरीतच संपुष्टात आले तर अंतिम सामना लाहोरमध्ये खेळविला जाणार आहे.
पाकिस्तानसाठी न्यूझीलंड अवघडच
पाकिस्तानचा संघ न्यूझीलंडविरुद्ध गेल्या दहा दिवसांत तिसऱ्यांदा भिडणार आहे. गेल्या दोन्ही सामन्यांत न्यूझीलंडने पाकिस्तानला विजयाची जराही संधी दिली नाही. लाहोरला खेळला गेलेला सामना न्यूझीलंडने 78 धावांनी सहज जिंकला होता, तर तिरंगी स्पर्धेचा अंतिम सामनासुद्धा पाच षटके आधीच आपल्या खिशात घातला. न्यूझीलंडचा खेळ पाहता ते आजच्या घडीला पाकिस्तानी संघाच्या दोन पावले पुढेच आहेत. आनंदाची बाब म्हणजे केन विल्यम्सनला गवसलेला सूर. या मालिकेत विल्यम्सनने 225 धावा करून आपल्या फलंदाजीतला जोश सर्वांना दाखवून दिला. पाकिस्तानच्या गोलंदाजीत फारशी धार नसली तरी फलंदाजीत मोहम्मद रिझवान आणि आगा सलमानच्या खेळाने पाकिस्तानच्या डावाला बळकटी देण्याचा प्रयत्न केलाय.
नवा चॅम्पियन लाभणार की…
चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयसीसी नवव्यांदा आयोजन करतेय आणि गेल्या आठ स्पर्धांमध्ये ऑस्ट्रेलियाने दोनदाही स्पर्धा जिंकलीय तर दक्षिण आफ्रिका, वेस्ट इंडीज, न्यूझीलंड, हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे प्रत्येकी एकदा स्पर्धा जिंकलेत. तसेच 2002 साली झालेल्या स्पर्धेचा अंतिम सामना पावसाच्या व्यत्ययामुळे पूर्ण होऊ शकला नाही. त्यामुळे हिंदुस्थान आणि श्रीलंकेला संयुक्तपणे विजेते जाहीर करण्यात आले होते. याचाच अर्थ अद्याप इंग्लंड, बांगलादेश आणि अफगाणिस्तान हे संघ एकदाही चॅम्पियन्स ठरलेले नाहीत. त्यामुळे या स्पर्धेला नवा विजेता लाभणार ही या तीन संघापैकी एक विजेता होईल, याबाबत सर्वांना उत्सुकता लागलीय.