ICC Champions Trophy 2025 – हिंदुस्थानला ‘चॅम्पियन्स’ होण्याची संधी

‘चॅम्पियन्स ट्रॉफी’ स्पर्धा अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपली असून सर्व संघ तयारीला लागले आहेत. अशातच अनेक दिग्गज क्रिकेटपटूंनी कोणते संघ उपांत्य फेरी गाठतील याबाबत तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे. ‘अ’ गटातून उपांत्य फेरीसाठी हिंदुस्थानला बहुतांश दिग्गजांनी प्रथम पसंती दिली आहे, तर घरच्या मैदानावर पाकिस्तानचा पराभव करून तिरंगी मालिका पटकावणाऱ्या न्यूझीलंडला दुसरी पसंती दिली जात आहे. तर घरच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी होत असल्याने पाकिस्तानला उपांत्य फेरी गाठेल, असे काही दिग्गजांचे म्हणणे आहे.

19 फेब्रुवारीपासून पाकिस्तान आणि न्यूझीलंड यांच्या कराची येथे उद्घाटनाचा सामना रंगणार आहे. नुकतीच पाकिस्तानमध्ये पार पडलेली न्यूझीलंड, पाकिस्तान आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तिरंगी मालिका न्यूझीलंडने खिशात घातल्याने उद्घाटनाच्या सामन्यातदेखील न्यूझीलंडचेच पारडे जड असल्याची चर्चा आहे.

गटात हिंदुस्थानचेच पारडे जड

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेत हिंदुस्थानचेच पारडे सर्वात जड असल्याचे अनेक दिग्गजांचे म्हणणे असून हिंदुस्थान हा विजेतेपदासाठीचा प्रमुख दावेदार असल्याची चर्चा आहे. 20 फेब्रुवारी रोजी हिंदुस्थान बांगलादेशविरुद्ध दुबई येथे होणाऱ्या सामन्याने स्पर्धेची दणक्यात सुरुवात करेल. ‘अ’ गटामध्ये हिंदुस्थानच्या जोडीला न्यूझीलंड, पाकिस्तान आणि बांगलादेश यांचा समावेश आहे. गेल्या काही महिन्यांपूर्वी न्यूझीलंडने हिंदुस्थानला कसोटी मालिकेत घरच्या मैदानावर व्हाईट वॉश देऊन इतिहास रचला होता. तसेच प्रत्येक आयसीसी स्पर्धांमध्ये न्यूझीलंडने हिंदुस्थानला धक्का दिलेला आहे, मात्र हिंदुस्थानने नुकतीच घरच्या मैदानावर इंग्लंड विरुद्धची एकदिवसीय मालिका 3-0 ने जिंकल्याने हिंदुस्थानच्या संघाचे मनोबल उंचावलेले आहे. असे असले तरी न्यूझीलंडला हलक्यात घेऊन चालणार नाही.

गटात चक्क अफगाणिस्तानला पसंती

‘ब’ गटामध्ये ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेचा समावेश आहे. सध्या ऑस्ट्रेलियाचा संघ दुखापतीमुळे पुर्णपणे कोसळला असून श्रीलंकेने व्हॉइट वॉश दिल्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफीतील त्यांच्या दावेदारीवर अनेकांनी प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहे, तर हिंदुस्थानविरुद्धची मालिका गमावलेली असली तरी इंग्लंड आणि आफ्रिका यांना हलक्यात घेऊन चालणार नाही. गेल्या काही आयसीसी स्पर्धांमध्ये अफगाणिस्तानने अनेक दिग्गज संघांना पराभवाचा धक्का दिलेला आहे. त्यामुळे ‘ब’ गटातून उपांत्य फेरीसाठी काही दिग्गज क्रिकेटपटूंनी चक्क अफगाणिस्तानला पसंती दिली आहे.

हिंदुस्थानपाकिस्तान द्वंद्व 23 फेब्रुवारीला

कट्टर प्रतिस्पर्धी हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यातील सामना 23 फेब्रुवारी रोजी दुबई येथे रंगणार आहे. इंग्लंडविरुद्धची मालिका विजयामुळे हिंदुस्थानचे मनोबल उंचावलेले आहे, तर दुसरीकडे तिरंगी मालिका गमावल्याने तसेच घरच्या मैदानावर चॅम्पियन्स ट्रॉफी पार पडत असल्याने पाकिस्तानवर दडपण असणार आहे. रोहित, विराट यांचा फॉर्म परतला असून श्रेयस, शुभमन तुफानी फलंदाजी करत आहेत, तर बुमराच्या अनुपस्थितीमध्ये शमी, जडेजा, कुलदीप हे अनुभवी गोलंदाज कमान संभाळणार आहेत. दुसरीकडे पाकिस्तानच्या गोलंदाजांसह फलंदाजांनी तिरंगी मालिकेत सुमार कामगिरी केल्याने 23 तारखेला हिंदुस्थानी फलंदाज पाकिस्तानच्या गोलंदाजीवर तुटून पडतील अशी चर्चा दिग्गज क्रिकेटपटूंबरोबर पाकिस्तानी मीडियात सुरू आहे. त्यामुळे हिंदुस्थानचेच पारडे जड मानले जात आहे.

 चॅम्पियन्सदुखापतग्रस्त

यंदाची चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धा ही दुखापतीच्याच चर्चांनी जास्त गाजली. स्पर्धा सुरू होण्यापूर्वीच अनेक दिग्गज चॅम्पियन्स खेळाडू स्पर्धेतून बाद झाल्याने यंदाची स्पर्धा ही चॅम्पियन्सविनाच पार पडणार आहे. दुखापतीचा सर्वात जास्त फटका हा ऑस्ट्रेलियाला बसला असून, कर्णधार पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क, जॉस हेजलवूड, शॉन मार्श हे स्पर्धेतून बाहेर पडले आहेत, तर दुसरीकडे हिंदुस्थानचा स्टार गोलंदाज जसप्रीत बुमरा दुखापतग्रस्त असल्याने हिंदुस्थानची गोलंदाजी कमकुवत झाली आहे. न्यूझीलंडचा गोलंदाज बेन सियर्स याला ही दुखापत झाल्याने स्पर्धा सोडावी लागली. तसेच इंग्लंड, अफगाणिस्तान, पाकिस्तानलादेखील दुखापतीचे ग्रहण लागले असून प्रमुख खेळाडू जायबंदी झाले आहेत.

 चॅम्पियन्स ट्रॉफी वेळापत्रक

  • गट हिंदुस्थान, पाकिस्तान, न्यूझीलंड, बांगलादेश
  • गट दक्षिण आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, अफगाणिस्तान, इंग्लंड

   दिनांक           सामना                    (ठिकाण)

19 फेब्रुवारी पाकिस्तान वि. न्यूझीलंड       (कराची)

20 फेब्रुवारी  हिंदुस्थान वि. बांगलादेश        (दुबई)

21 फेब्रुवारी  अफगाणिस्तान वि. द.आफ्रिका          (कराची)

22 फेब्रुवारी  ऑस्ट्रेलिया वि. इंग्लंड            (लाहोर)

23 फेब्रुवारी   हिंदुस्थान वि. पाकिस्तान      (दुबई)

24 फेब्रुवारी  बांगलादेश वि. न्यूझीलंड        (रावळपिंडी)

25 फेब्रुवारी  ऑस्ट्रेलिया वि. द.आफ्रिका     (रावळपिंडी)

26 फेब्रुवारी  अफगाणिस्तान वि. इंग्लंड     (लाहोर)

27 फेब्रुवारी पाकिस्तान वि. बांगलादेश      (रावळपिंडी)

28 फेब्रुवारी  अफगाणिस्तान वि. ऑस्ट्रेलिया          (लाहोर)

1मार्च        द.आफ्रिका वि. इंग्लंड     (कराची)

2 मार्च       हिंदुस्थान वि. न्यूझीलंड  (दुबई)

4 मार्च       उपांत्य फेरी – 1        (दुबई)

5 मार्च  उपांत्य फेरी -2   (लाहोर)

9 मार्च       अंतिम सामना