Champions Trophy 2025 चे वेळापत्रक जाहीर; ‘या’ दिवशी रंगणार हिंदुस्थान-पाकिस्तान युद्ध

चॅम्पियन्स ट्रॉफीची उत्कंठा आता शिगेला येऊन पोहचली आहे. हिंदुस्थान-पाकिस्तान सामन्याची दोन्ही देशांतील चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. अशातच चॅम्पियन्स ट्रॉफीचे वेळापत्रक जाहीर करण्यात आले आहे. त्यानुसार स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात येणार असून टीम इंडियाचे सर्व सामने UAE मध्ये खेळवण्यात येणार आहेत.

चॅम्पियन्स ट्रॉफीला 19 फेब्रुवारी पासून सुरुवात होणार आहे. 8 संघांचा या स्पर्धेत सहभाग असून दोन्ही संघांची दोन गटांमध्ये विभागणी करण्यात आली आहे. 19 फेब्रुवारी रोजी गतविजेता पाकिस्तान आणि न्यूझीलंड या संघांमध्ये पहिली लढत होऊन स्पर्धेला सुरुवात होईल. तसेच टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीचा श्री गणेशा 20 फेब्रुवारीला बांगलादेशविरुद्ध करेल. त्यानंतर 23 फेब्रुवारीला हिंदुस्थान आणि पाकिस्तान हे पारंपरिक प्रतिस्पर्धी आपापसात भिडतील. 2 मार्च रोजी टीम इंडियाचा तिसरा सामना न्यूझीलंडविरुद्ध होणार आहे. ESPN Cricinfo ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

सेमी फायनल आणि फायनलच्या सामन्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आलेल्या आहेत. टीम इंडिया जर सेमी फायनल किंवा फायनलमध्ये पोहोचली तर हे सामने UAE मध्ये खेळवण्यात येणार आहेत. तसेच जर टीम इंडिया सेमी फायनल किंवा फायनलमध्ये पोहचण्यात असमर्थ ठरली, तर सेमी फायनल आणि फायनलचा सामना लाहोरमध्ये खेळवण्यात येईल. पहिली सेमी फायनल 4 मार्च रोजी आणि दुसरी सेमी फायनल 5 मार्च रोजी होणार आहे. तसेच फायनलचा सामना 9 मार्च रोजी खेळवण्यात येणार आहे.

अ गटात – हिंदुस्थान, न्यूझीलंड, बांगलादेश आणि पाकिस्तान

ब गटात – अफगानिस्तान, ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिका