ICC Champions Trophy 2025 – पाकिस्तान झुकायला तयार, पण ICC सह हिंदुस्थानसोमर ठेवल्या दोन अटी

चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन पाकिस्तानात करण्यात आले आहे. मात्र सुरक्षेच्या आणि राजकीय कारणांमुळे टीम इंडिया पाकिस्तानात खेळण्यासाठी जाणार नाही. त्यामुळे चॅम्पियन्स ट्रॉफी पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलवर खेळवावी, अशी बीसीसीआयसह आयसीसीची मागणी आहे. यासंदर्भात दुबई येथे बैठक पार पडल्यानंतर पाकिस्तान चॅम्पियन्स ट्रॉफी हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यास तयार झाला आहे. परंतु सर्वांना समान न्याय असावा या अनुषंगाने पीसीबीने टीम इंडिया संदर्भात आयसीसीसमोर दोन अटी ठेवल्या आहेत. या अटी मान्य झाल्यानंतर अंतिम निर्णय घेण्यात येईल अशी भूमिका पीसीबीने घेतली आहे.

पाकिस्तान क्रिकेट बोर्डाची ICC आणि BCCI सोबत मागील आठवड्यामध्ये दुबई येथे बैठक पार पडली. यावेळी पीसीबीने काही अटी आयसीसीसह बीसीसीआय समोर ठेवल्या आहेत. तसेच एक दीर्घकालीन करार करण्याची मागणी सुद्धा केली आहे. या करारानुसार, आयसीसीच्या माध्यमातून हिंदुस्थानात आयोजित करण्यात येणाऱ्या स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवण्यात याव्यात, तसेच पाकिस्तानचा संघ सुद्धा हिंदुस्थानात खेळण्यास जाणार नाही, अशा काही पीसीबीच्या अटी आहे. मात्र हा करार किती वर्षांसाठी असणार हे अद्याप निश्चित करण्यात आले नाही. ESPNcricinfo ने यासंदर्भात वृत्त दिले आहे.

हिंदुस्थानात ICC च्या माध्यामातून 2031 सालापर्यंत विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात येणार आहे.  टीम इंडिया आणि श्रीलंका या दोन देशांमध्ये सयुंक्तरित्या ICC टी-20 वर्ल्ड कप फेब्रुवारी 2026 मध्ये आयोजित करण्यात येणार आहे. त्यानंतर ऑक्टोबर 2029 मध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी आणि ऑक्टोबर-नोव्हेंबर 2031 मध्ये बांगलादेशसोबत वर्ल्ड कपचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच 2025 साली महिला वर्ल्ड कप सुद्धा हिंदुस्थानात होणार आहे.