न्यूझीलंडने सामना, तर मिलरने लाहोर जिंकले; आता चॅम्पियन्स होण्यासाठी हिंदुस्थान-न्यूझीलंड यांच्यात द्वंद्व

रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सनच्या शतकांच्या जोरावर उभारलेल्या 363 धावांच्या आव्हानापुढे दक्षिण आफ्रिकन फलंदाजांनी प्रारंभीच शरणागती पत्करली होती. आफ्रिकेचा पराभव निश्चित होता, मात्र शेवटच्या 3 षटकांतील सर्व 18 चेंडू खेळत केलेल्या झंझावातामुळे डेव्हिड मिलरने शतक तर ठोकलेच, पण आपल्या संघाच्या शतकी पराभवाचे अंतर 50 धावांवर आणले. त्यामुळे आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीचा आजचा उपांत्य सामना न्यूझीलंडने जिंकला असला तरी लाहोर मिलरने जिंकले. तिसऱ्यांदा चॅम्पियन्स ट्रॉफीची अंतिम फेरी गाठणाऱ्या न्यूझीलंडला तब्बल 25 वर्षांनंतर आयसीसीचे चॅम्पियन्स होण्यासाठी येत्या रविवारी हिंदुस्थानशी झुंज करावी लागणार आहे.

न्यूझीलंडचे 363 धावांचे आव्हान दक्षिण आफ्रिकेला पेलवलेच नाही. रायन रिकल्टनची विकेट पडल्यानंतर कर्णधार तेम्बा बवुमा आणि रॅसी वॅन डर डय़ुसेन यांनी 105 धावांची केलेली सावध भागी आफ्रिकन डावाला मजबुती नव्हे, तर महागात पडली. बवुमाने वेगाने धावा फटकावण्याऐवजी 71 चेंडूंत 56 धावांची काहीशी संथ खेळी केली. परिणामतः आफ्रिकेचा रनरेट घसरला होता. तो रॅसीने (69) ट्रकवर आणण्याचा प्रयत्न केला. पण तो बाद झाल्यानंतर आफ्रिकेची गाडी विजयाच्या ट्रकवरून घसरली ती पुन्हा ट्रकवर येऊच शकली नाही. 27 चेंडूंत 107 धावांचे अवघड आव्हान असताना आफ्रिकेची 9 बाद 256 अशी दुर्दशा होती.  सामना तेथेच गमावला होता. पण 49 चेंडूंत 52 धावा करणाऱ्या मिलरने शेवटच्या तीन षटकांतील सर्व चेंडू खेळत 2 षटकार आणि 7 चौकार खेचत 48 धावा चोपल्या आणि 67 चेंडूंत 100 धावांची संस्मरणीय खेळी साकारली.

मधल्या फळीने घात केला

बवुमा-रॅसीच्या शतकी भागीनंतर मधल्या फळीत एडन मार्करम, हेन्रीक क्लासन यांच्याकडून झंझावाती खेळाची अपेक्षा होती, पण या दोघांनाही लौकिकास साजेसा खेळ करता आला नाही आणि तेथे सामना दक्षिण आफ्रिकेच्या हातून निसटला. सर्व खंदे वीर बाद झाल्यानंतर डेव्हिड मिलरने 67 चेंडूंत 10 चौकार आणि 4 षटकार खेचत ठोकलेल्या सातव्या एकदिवसीय शतकाने एकतर्फी सामन्यात जीव ओतला. मिलरच्या या फटकेबाज आणि मनोरंजक खेळीने दक्षिण आफ्रिकेला धावांचे त्रिशतक गाठून दिले आणि पराभवाचे अंतर 50 धावांवर आणले.

विक्रम मोडण्याचा विक्रम

लाहोरच्याच मैदानावर इंग्लंडने ऑस्ट्रेलियाविरुद्ध 8 बाद 351 अशी मजल मारत चॅम्पियन्स ट्रॉफीतील न्यूझीलंडचा 347 सर्वाधिक धावांचा 20 वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला. मग त्याच सामन्यात ऑस्ट्रेलियाने 352 धावांचा पाठलाग करताना 5 बाद 356 धावांचा नवा विक्रम रचला. एकाच दिवशी दोनदा विक्रम मोडल्यानंतर दोन आठवडय़ानंतर पुन्हा तो विक्रम न्यूझीलंडने मोडला आणि 6 बाद 362 ही नवी सर्वोच्च धावसंख्या उभारली.

शेवटच्या 20 षटकांत 181 धावा

रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सन जोडीने 162 धावांची भागी रचली. ही जोडी 34व्या षटकात फुटली. या दोघांच्या खेळींमुळे 30 षटकांत 181 धावा करणाऱ्या न्यूझीलंडने अखेरच्या 20 षटकांत 181 धावा चोपून काढल्या. त्यापैकी 110 धावा डॅरिल मिचेल आणि ग्लेन फिलीप्स यांच्या घणाघाताने काढून दिल्या. मात्र या दोघांचेही अर्धशतक एका धावेने हुकले. मिचेलने 37 चेंडूंत 49 तर फिलीप्सने 27 चेंडूंत 49 धावा ठोकल्या. गेल्या सामन्यात आफ्रिकेच्या विजयाचा शिल्पकार ठरलेल्या मार्को यान्सनला 79 धावा फोडून काढल्या आणि त्याला एकही विकेट टिपता आली नाही.

विल्यम्सनची आफ्रिकेविरुद्ध शतकी हॅटट्रिक

 दक्षिण आफ्रिकेविरुद्ध 102 धावांची शतकी खेळी साकारत विल्यम्सनने आपल्या वन डे कारकिर्दीत 15वे शतक पूर्ण केले. सोबत आफ्रिकेविरुद्ध शतकांची अनोखी हॅटट्रिकही साजरी केली. आजवर आफ्रिकेविरुद्ध 4 शतके ठोकणाऱ्या विल्यम्सनने 2019मध्ये बार्ंमगहॅमला 106 धावांची खेळी केली होती. त्यानंतर गेल्याच महिन्यात गद्दाफी स्टेडियमवर झालेल्या तिरंगी मालिकेत नाबाद 133 धावा ठोकल्या होत्या आणि आज 102 धावा ठोकत शतकी हॅटट्रिक साजरी केली. केनने आतापर्यंत आफ्रिकेविरुद्ध 19 सामन्यांत 60 धावांच्या सरासरीने 905 धावा काढताना 4 शतके आणि 7 अर्धशतके साजरी केली आहेत.

रवींद्रविल्यम्सनची शतके

टॉस जिंकून फलंदाजीला उतरलेल्या न्यूझीलंडला विल यंग – रचिन रवींद्रने 48 धावांची सलामी दिली. यंग बाद झाल्यानंतर अत्यंत शांतपणे खेळ करणाऱ्या रचिन रवींद्र आणि केन विल्यम्सनने एकेरी-दुहेरी धावांवर अधिक भर देत दुसऱ्या विकेटसाठी 25 षटकांत 164 धावांची भागी रचली. या भागीच्याच पायामुळे न्यूझीलंड 362 धावांचे जबरदस्त आव्हान उभारू शकले. रचिनने स्पर्धेतील आपले दुसरे शतक साकारताना 93 चेंडूंत तर विल्यम्सनने 91 चेंडूंत शतकी टप्पा गाठला. रचिनची खेळी 108 धावांवर तर विल्यम्सन 102 धावांवर संपली.

ऱचिनचे शतकी पंचक

रचिन रवींद्रने 108 धावांची शतकी खेळी करत स्पर्धेतील आपले दुसरे शतक पूर्ण केले आणि हे त्याचे आयसीसी स्पर्धेतील पाचवे शतक ठरले आहे. अवघ्या 32 सामन्यांच्या कारकिर्दीत रचिनने ठोकलेली पाचही शतके आयसीसी स्पर्धेतील आहेत. 2023 साली हिंदुस्थानात झालेल्या वर्ल्ड कपमध्ये त्याने ना. 123 (इंग्लंड), 116 (ऑस्ट्रेलिया) आणि 108 (पाकिस्तान) धावांच्या शतकी खेळी केल्या होत्या. आयसीसी स्पर्धेत सर्वाधिक शतके ठोकण्याचा विक्रम रोहित शर्माच्या (8) नावांवर आहे.