ICC Champions Trophy 2025 – नो टेन्शन… पाऊस पडला तरी चॅम्पियन्स ठरणार

चॅम्पियन्स ट्रॉफी स्पर्धेच्या इतिहासात पावसाने नेहमीच फलंदाजी करत अडथळे निर्माण केलेत. या स्पर्धेतील तीन सामनेही पावसामुळे निकालाविना रद्द करावे लागलेत. एवढेच नव्हे तर, 2002 सालच्या चॅम्पियन्स ट्रॉफीत अंतिम सामन्यात पावसाने घातलेल्या गोंधळामुळे सामना अर्धवट अवस्थेतच राहिला आणि अखेर श्रीलंका आणि  हिंदुस्थान या दोन्ही संघांना विजेतेपद संयुक्तपणे देण्यात आले होते. मात्र आता पाऊस पडला तरी अंतिम फेरीत खेळणाऱ्या हिंदुस्थान आणि न्यूझीलंड संघाला टेन्शन नसणार. कारण पाऊस पडला तरी एक दिवस राखीव ठेवण्यात आला आहे. तसेच सामन्यावेळी पावसाची स्थिती असली तर दोन तास जादाही ठेवण्यात आले आहेत. त्यामुळे पाऊस पडला तरी या स्पर्धेला चॅम्पियन्स मिळणार हे निश्चित आहे.

सध्या सुरू असलेल्या आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीदरम्यान पाकिस्तानात झालेल्या सामन्यांपैकी तीन सामने पावसाच्या व्यत्ययामुळे रद्द करण्यात आले आहेत. विशेष म्हणजे, दोन लढती एकही चेंडू न टाकता रद्द करण्यात आल्या. त्यामुळे रविवारी दुबईत होणाऱ्या सामन्यातही पावसाने गोंधळ घातला तर काय, असा प्रश्न क्रिकेटप्रेमींना पडलाय. पण रविवारी होणाऱ्या या सामन्यात पावसाच्या हजेरीची शक्यता कमीच आहे. त्यामुळे तो सामना त्याच दिवशी खेळविला जाईल, असा हवामान खात्याचा अंदाज आहे.

…तेव्हा चॅम्पियन्स ट्रॉफी विभागून दिली होती

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या इतिहासात 2002 साली हिंदुस्थान आणि श्रीलंका यांच्यातील सामना पावसाने अक्षरशः धुऊन काढला होता. या सामन्यात श्रीलंकेने प्रथम फलंदाजी करताना  7 बाद 222 धावा केल्या होत्या. हिंदुस्थान 223 धावांचा पाठलाग करत असताना 8 षटकांनंतर पावसाचे आगमन झाले आणि मग पावसानेच जोरदार फलंदाजी केली. त्यामुळे पुढे सामनाच सुरू होऊ शकला नाही. तेव्हा आयसीसीच्या स्पर्धांमध्ये राखीव दिवसाची तरतूद नसल्यामुळे निकालाविना संपलेल्या या अंतिम सामन्यात हिंदुस्थान आणि श्रीलंकेला विजेतेपद विभागून देण्यात आले होते.

चॅम्पियन्स ट्रॉफीच्या अंतिम फेरीचे नियम

  • अंतिम सामन्यासाठी मूळ दिवस 9 मार्चसह 10 मार्च या राखीव दिवसाचीही तरतूद करण्यात आली आहे. तसेच या दोन्ही दिवशी 2 तासांचा जादा खेळ उपलब्ध.
  • सामन्याचा निकाल काढण्यासाठी दोन्ही डावांत किमान 25 षटकांचा खेळ आवश्यक.  तर पावसाच्या व्यत्ययानंतर डकवर्थ लुईस नियमाच्या आधारे घेतला जाऊ शकतो.
  • सामना नियोजित दिवशी पूर्ण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करण्याचे आयसीसीचे ध्येय.
  • नियोजित दिवशी खेळ सुरू झाला, मात्र तो पूर्ण होऊ न शकल्यास राखीव दिवशी सामना नव्याने सुरू न करता खेळ जेथे थांबला त्यापुढे सुरू केला जाईल. नियोजित दिवशी सामना 50 षटकांचा किंवा त्यापेक्षा कमी षटकांचा खेळवायचा, ते वातावरणाच्या परिस्थितीवर अवलंबून असेल.
  • पावसाच्या संततधारेमुळे नियोजित आणि राखीव दिनी सामनाच होऊ शकला नाही किंवा किमान षटकांचाही खेळ न झाल्यास किंवा सामनाच पावसामुळे वाहून गेला तर उभय संघांना संयुक्त विजेते घोषित केले जाईल.