
शेतकऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवून दमदाटी केल्याप्रकरणी प्रशिक्षणार्थी आयएएस अधिकारी पूजा खेडकर यांची आई मनोरमा खेडकर यांच्यासह सात जणांविरुद्ध पौड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. याप्रकरणी पुणे ग्रामीण पोलिसांचे स्थानिक गुन्हे अन्वेषण पथक सोमवारी सकाळी बाणेरमधील खेडकर यांच्या बंगल्यावर धडकले होते. मात्र, कारवाईची कुणकुण लागल्यामुळे खेडकर दाम्पत्य पसार झाले आहे. दरम्यान, पूजा यांच्यासह त्यांच्या कुटुंबीयांच्या कारनाम्याचा अहवाल पोलीस महासंचालक कार्यालयाने मागविला असल्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितले.
मनोरमा दिलीप खेडकर, दिलीप खेडकर आणि अंबादास खेडकर यांच्यासह सातजणांविरुद्ध पौड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल आहे. खेडकर यांच्यासोबत शेतकऱयाला धमकाविण्यासाठी आलेल्या अंगरक्षकांविरुद्ध (बाऊन्सर) गुन्हा दाखल आहे. आरोपींमध्ये महिला अंगरक्षकांचा समावेश आहे. मुळशीतील धडवली गावात शेतकऱयाला मनोरमा खेडकर यांना पिस्तुलाचा धाक दाखवून धमकावल्याचा व्हिडिओ व्हायरल झाला होता. याप्रकरणी शेतकरी पंढरीनाथ कोडींबा पासलकर (65, रा. केडगाव, आंबेगाव पुनर्वसन, ता. दौंड) यांनी पौड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली होती. त्यानुसार पौड पोलिसांनी खेडकर दाम्पत्याला जबाबासाठी पोलीस ठाण्यात बोलावले होते. त्यासाठी त्यांना वारंवार पह्नही करण्यात आले. मात्र, त्यांनी पोलिसांना प्रतिसाद दिला नाही.
पोलिसांनी नोटीस बजावूनही प्रतिसाद न दिल्यामुळे खेडकर दाम्पत्याविरूद्ध कारवाई करण्यासाठी पुणे ग्रामीण पोलिसांच्या स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पथक सोमवारी बाणेरमध्ये गेले होते. मात्र, खेडकर कुटूंबीय बंगल्याला कुलूप लावून पसार झाल्याचे प्राथामिक माहितीनुसार स्पष्ट झाले आहे. दरम्यान, त्यांचा शोध घेण्यासाठी पौड पोलिसांसह स्थानिक गुन्हे शाखेची पथके रवाना करण्यात आली आहेत. पिस्तुलाचा धाक दाखवून शेतकऱयांना धमकी दिल्याप्रकरणी कठोर कारवाईचे आदेश पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी दिले आहेत. त्यामुळे खेडकर दाम्पत्यासह इतरांविरूद्ध कारवाईची शक्यता वर्तविली जात आहे.
खेडकर कुटुंबीयांना वारंवार फोन करून हजर राहण्याच्या सूचना दिल्या आहेत. मात्र, ते हजर झाले नाहीत. सध्या त्यांचे फोन बंद असून, पोलीस त्यांचा शोध घेत आहेत.
z अविनाश शिळीमकर, वरिष्ठ पोलीस निरीक्षक, स्थानिक गुन्हे शाखा, पुणे ग्रामीण