आर्थिक खड्डय़ातील उपक्रमाचा पाय खोलात; बेस्ट ‘जीएम’पदी नियुक्ती झालेल्या कांबळे यांची पदभार स्वीकारण्याआधीच बदली

सर्वसामान्य मुंबईकरांची जीवनवाहिनी असणारा ‘बेस्ट’ उपक्रम आर्थिक खड्डय़ात असताना महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केलेले आयएएस हर्षदीप कांबळे यांची पदभार न स्वीकारताच बदली करण्यात आली आहे. त्यामुळे गेल्या आठ ते दहा दिवसांपासून ‘बेस्ट’चा कारभार ‘जीएम’ नसल्याने वाऱ्यावर पडला आहे. त्यामुळे आर्थिक डबघाईला आलेल्या ‘बेस्ट’ची जबाबदारी घेणार तरी कोण असा सवाल निर्माण झाला आहे.

‘बेस्ट’च्या परिवहन विभागात गेल्या काही दिवसांपासून अपघाताच्या घटना वारंवार घडल्यामुळे नुकतीच महाव्यवस्थापक अनिल डिग्गीकर यांची बदली केल्याचे बोलले जात आहे. यामध्ये कुर्ल्यातील अपघातात तब्बल नऊ जणांचा बळी गेल्यानंतर अपघातांची मालिकाच सुरू होऊन काही दिवसांतच तीन जणांचा बळी बेस्ट अपघातात झाल्याने बेस्टला टीकेचा सामना करावा लागत होता. असे असताना राज्य सरकारकडून हर्षदीप कांबळे यांची आठ दिवसांपूर्वी बेस्टच्या महाव्यवस्थापकपदी नियुक्ती केली. मात्र कांबळे यांनी बेस्ट महाव्यवस्थापक पदाचा कार्यभार स्वीकारलाच नाही. त्यांची पुन्हा बदली करण्यात आली असून त्यांना प्रधान सचिव, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग, मंत्रालय, मुंबई येथे विजय वाघमारे यांच्या जागी नियुक्त करण्यात आले आहे.

‘बेस्ट’ला वाली कोण?

आर्थिक संकटात असलेल्या बेस्टची जबाबदारी घेण्यास पालिकेने नकार दिल्याने बेस्टचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. असे असताना आता आयएएस दर्जाचे अधिकारीदेखील बेस्टची धुरा आपल्या खांद्यावर घेण्यास तयार नाहीत, हे दुर्दैवी आहे. यामुळे ‘बेस्ट’ला वाली कोण, असा सवालही निर्माण झाल्याचे बेस्ट कामगार सेनेचे अध्यक्ष सुहास सामंत यांनी सांगितले.