तुम्ही कितीही माइक बंद करा, मी बोलत राहणार. दलितांची, वंचितांची बाजू मांडत राहाणार, अशा शब्दांत लोकसभेचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी आज मोदी सरकारला इशारा दिला. संविधान दिनानिमित्त आज दिल्लीतील तालकटोरा स्टेडियमवर काँग्रेसने मोठा कार्यक्रम आयोजित केला होता. यावेळी राहुल गांधी यांचे भाषण सुरू असताना अचानक माइक बंद पडला. माइक दुरुस्त झाल्यानंतर राहुल गांधी पुन्हा भाषणाला उभे राहिले. दरम्यान, संविधान हा अहिंसेचा मार्ग आहे. संविधान सत्य आणि अहिंसेचे पुस्तक आहे, असेही ते म्हणाले.
जेव्हा कुणी दलितांसाठी, वंचितांसाठी आवाज उठवतो तेव्हा त्यांचा माइक असाच बंद केला जातो. त्याचा आवाज दाबण्याचा प्रयत्न केला जातो. परंतु, तुम्ही असे कितीही माइक बंद केले तरी मी मात्र, बोलत राहाणार, असे राहुल गांधी म्हणाले. या कार्यक्रमात राहुल गांधी यांनी पुन्हा एकदा जातीनिहाय जनगणनेची मागणी केली. देशातील टॉप उद्योगपतींमध्ये एकही दलित, वंचित किंवा आदिवासी नाही. देश चालवणाऱया अधिकाऱयांमध्ये ओबीसी आणि दलितांचे प्रतिनिधित्व नाही, असेही राहुल गांधी म्हणाले.
तेलंगणात जातनिहाय जनगणनेला सुरुवात
तेलंगणात आमचे सरकार आले आहे. त्यामुळे आम्ही तेलंगणात जातीनिहाय जनगणनेला सुरुवात केली आहे. यात लोकांना जे प्रश्न विचारले जाताहेत ते राज्यातील दलित, वंचित आणि गरिबांनी मिळून तयार केले आहेत. हे एक ऐतिहासिक पाऊल आहे, जिथे जिथे आमचे सरकार येईल तिथे तिथे आम्ही अशाच पद्धतीने जातीनिहाय जनगणना करणार आहोत, असे राहुल गांधी म्हणाले.