कोपा अमेरिकाच्या जेतेपदाच्या लढतीत घोटय़ाला झालेल्या दुखापतीमुळे अर्जेंटिनाचा कर्णधार लिओनल मेस्सी अक्षरशः कळवळला होता. आगामी वर्ल्ड कपमध्ये खेळण्याबाबत साशंकता व्यक्त केली जात असताना खुद्द मेस्सीनेच आपण आता ठीक असून लवकरच मैदानात परतेन आणि आपल्या आवडीचे काम करीन, अशी आशा व्यक्त केली आहे. आपला संघ विजेता ठरल्यामुळे आपण खूप आनंदी असल्याचेही त्याने आठवणीने सांगितले. दुखापतीमुळे मेस्सी संघाच्या जल्लोषात सहभागी होऊ शकला नाही. त्याची दुखापत किती गंभीर आहे हे आगामी काळात कळेलच. घोटय़ाची दुखापत बरी होण्यासाठी किमान तीन आठवडे लागत असल्यामुळे मेस्सी ऑगस्टपर्यंत आपला क्लब इंटर मियामीसाठी खेळू शकणार नाही. जर त्याची दुखापत फारशी गंभीर नसली तर तो लवकरच मैदानात दिसू शकेल. पण यासाठी आणखी किती दिवस मेस्सीला बाहेर राहावे लागणार, हे दुखापतीच्या अहवालानंतरच कळू शकेल.