मला तीन हजारांची गरज आहे ऽऽ हो ! चक्क चोरट्याची महिलेस विनवणी

चोरट्याने घरात -शिरल्यानंतर महिलेचे गंठण हिसकाविले. महिलेने हे खोटे असल्याचे सांगताच चोरट्याने चक्क वृद्ध महिलेला मला तीन-चार हजार रुपयांची गरज असल्याचे सांगत पैसे देण्याची विनवणी केल्याचा प्रकार सिडको एन-8 भागात उघडकीस आला. चोरट्याला पैसे नसल्याचे सांगताच आल्यापावली परत निघालेल्या चोरट्याने गप्प पडून रहा म्हणत खिडकीतून उडी मारून पसार झाला.

बजरंग चौक ते बळीराम पाटील हायस्कूल रोडवर सेवानगर हाऊसिंग सोसायटी असून, या सोसायटीमध्ये सुनील जोशी हे राहतात. शनिवारी पहाटे अडीच वाजता सोसायटीच्या मागच्या बाजूने एक चोरटा घरात शिरला होता. यावेळी घरात 70 वर्षीय सुरेखा जोशी त्यांना जाग आली. त्यांना चोरट्याने दरडावत जीव प्यारा असेल तर गप्प पडून रहा, असा दम देत त्यांच्या गळ्यातील पिवळे गंठण देण्यास सांगतले, त्यांनी गंठण बनावट असल्याचे सांगितले मात्र चोरट्याने शेजारच्या खोलीत लाईटच्या उजेडात तपासून पाहिल्यानंतर गंठण पुन्हा वापस दिले. त्यानंतर मला तीन-चार हजारांची अर्जंट गरज आहे द्या म्हणत विनवणी केली. मात्र, पैसे नसल्याचे सांगताच तो चोरटा आल्यापावली परत गेला. या घटनेची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक सोमनाथ जाधव यांनी घटनास्थळी पोलिसांना पाठविले होते. याप्रकरणी पोलिसांनी ठाण्यात नोंद घेतली आहे.