मी मत देतो कुणाला हे मला माहीत आहे, पण जाते कुणाला हे कळतच नाही; जितेंद्र आव्हाड यांचा निशाणा

राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त ठिकठिकाणी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र, देशातील निवडणूक प्रक्रिया आणि निवडणूक आयोगाची पक्षपाती भूमिका यावर देशभरातून नाराजी व्यक्त होत आहे. तसेच ईव्हीएमबाबतही प्रश्नचिन्ह उपस्थित केले जात आहे. माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज यांनीही महाराष्ट्र निवडणुकीतील मतदान प्रक्रियेबाबत अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. तसेच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही राष्ट्रीय मतदार दिनानिमित्त निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.

जितेंद्र आव्हाड यांनी एक्सवर याबाबत पोस्ट केली आहे. त्यात त्यांनी म्हटले आहे की, सामाजिक लोकशाहीच्या पायावर राजकीय लोकशाहीची उभारणी होते. देशाचा राज्यकारभार योग्य, शिक्षित व जनतेच्या प्रश्नांची जाण असलेल्या उमेदवाराच्याच हाती द्या. कारण त्यातून संसदीय लोकशाहीचे बळकटीकरण होते – डॉ.बाबासाहेब आंबेडकर
पण आधुनिक भारत देशात मी मत देतो कुणाला हे मला माहीत आहे पण जाते कुणाला हे कळतच नाही. राष्ट्रीय मतदार दिनाच्या सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा..! अशी पोस्ट करत आव्हाड यांनी निवडणूक आयोगावर निशाणा साधला आहे.