अशा वातावरणात मी आता जास्त जगू इच्छित नाही! मल्लिकार्जुन खरगेंचे राज्यसभेत उद्विग्न उद्गार

सध्याचे राजकीय वातावरण अत्यंत गढूळ झाले आहे. काल मी सभागृहात नसताना माझ्यावर भाजपच्या एका सदस्याने घराणेशाहीचे आरोप लावले. राजकारणात येणारी मी माझ्या घराण्यातली पहिली व्यक्ती आहे. तरीही हे बिनबुडाचे आरोप केले गेले. माझे नाव मल्लिकार्जुन आहे. शिवाचे, महादेवाचे नाव आहे, असा उल्लेख केला गेला. अत्यंत बेछूट आरोप करण्याची सध्या पद्धतच रूढ झाली आहे, त्यामुळे अशा वातावरणात मी जास्त जगू इच्छित नाही, असे उद्विग्न उद्गार राज्यसभेतील विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी काढले.

राज्यसभेत आज कामकाज सुरू होताच ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंचे सभागृहाने अभिनंदन केले. त्यानंतर खरगे यांनी आपली बाजू मांडली. भाजपच्या घनशाम तिवाडी यांनी काल खरगे यांच्या अनुपस्थितीत त्यांच्यावर घराणेशाहीचा आरोप लावला होता. त्यामुळे खरगे अत्यंत उद्विग्न असल्याचे दिसून आले. माझ्या घराण्यात कोणी राजकारणात नव्हते. मी आलो. माझ्या वडिलांनी आशीर्वाद दिले. त्यांचे वय 85 नव्हे तर 95 होते, असा उल्लेख खरगेंनी करताच, सभापती जगदीप धनखड यांनी तुम्ही तुमच्या वडिलांपेक्षाही वयाच्या बाबतीत पुढे जा, अशा सदिच्छा दिल्या. त्या वेळी अशा दूषित वातावरणात आता जास्त जगण्याची माझी इच्छा उरली नाही, असे उद्गार खरगेंनी काढले, त्या वेळी त्यांचा कंठ दाटून आला होता. माझ्यावर बिनबुडाचे घराणेशाहीचे आरोप लावता, मी तुमची घराणेशाहीची यादी काढली तर पळताभुई होईल, असा सूचक इशाराही खरगेंनी दिला. त्यावर सभापतींनी आपण उद्विग्न होऊ नका, असा सल्ला दिला.

पीएम लोकसभा मे आओ…!

लोकसभेत आज पंतप्रधानांनी सभागृहात उपस्थित राहावे, यासाठी विरोधी पक्षाच्या खासदारांनी जोरदार घोषणाबाजी केली. पंतप्रधान हल्ली सभागृहात येत नाहीत, हा मुद्दा हाती घेऊन पीएम लोकसभा में आओ, अशी घोषणाबाजी या खासदारांनी केली. तत्पूर्वी सभागृहाचे कामकाज सुरू होताच ऑलिंपिक विजेत्या खेळाडूंच्या अभिनंदनचा ठराव सभागृहाने एकमुखाने मंजूर केला.