बॉम्बे नको मुंबई नाव हवं, अशी मागणी करणारा मी होतो- अमित शहा

महाराष्ट्रातील उद्योग गुजरातला पळवले. मुंबईतील आर्थिक केंद्र गुजरातला नेले. त्याच गुजरातमधील केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बॉम्बेचे मुंबई करा अशी मागणी करणाऱ्यांमध्ये मीसुद्धा होतो, असा आश्चर्यजनक दावा केला आहे. मुंबई दौऱ्यात एका गुजराती दैनिकाच्या वतीने आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

“मुंबईसाठी ज्या लोकांनी आंदोलन केलं, मुंबई हेच नाव हवं, अशी मागणी ज्या लोकांनी केली होती, त्यामध्ये मी देखील होतो. तेव्हा बॉम्बे नको तर मुंबई नाव हवं, अशी मागणी मी देखील केली होती’’, असे अमित शहा म्हणाले.

आपल्या दोन नातवंडांनी संस्कृत किंवा गुजराती भाषा शिकावी, यासाठी आपण त्यांना वेळ देतो आणि अगदी त्यांच्या शाळेचे शिक्षक भाषा आणि व्याकरण व्यवस्थित शिकवतात की नाही हे देखील पाहत असतो, असे ते म्हणाले. कमीत कमी आपल्या घरात तरी मातृभाषेतून बोला, असे आवाहनही त्यांनी केले. त्यासाठी नव्या शैक्षणिक धोरणात मातृभाषा सक्तीची करणार, असेही त्यांनी सांगितले.