आय कॅन सी यू….हॅकरने संपूर्ण कुटुंबाचे फोन हॅक करून घेतला घराचा ताबा

सायबर गुन्हेगाराने लखनौमधील एका कुटुंबातील सर्व सदस्यांचे मोबाईल फोन हॅक केल्याची धक्कादायक घटना घडलीय. एवढेच नव्हे तर घरातील प्रत्येकावर हॅकर पाळत ठेवून आहे. आय कॅन सी यू… तुमचे घर माझ्या कंट्रोलमध्ये आहे, अशी धमकी दिली आहे. त्यामुळे हे कुंटुंब घाबरून गेले आहे. भीतीपोटी त्यांनी लोकांशी संपर्क तोडला.

याप्रकरणी महिनाभरानंतर हुसैनगंज भागात राहणाऱ्या विक्रम चोप्रा याने पोलिसांत तक्रार केली. विक्रम चोप्राने पोलिसांना सांगितले की, 17 जानेवारीपासून त्याच्यासोबत विचित्र घटना घडत आहेत. त्याचा आणि त्याच्या कुटुंबीयांचा मोबाईल फोन हॅक झालाय. एवढेच नव्हे तर इंटरनेटवर चालणारी सर्व इलेक्ट्रॉनिक डिवायसेस हॅक झाली आहेत. त्यांच्या प्रत्येक हालचालीवर हॅकर लक्ष ठेवून आहे. हॅकरने घरात कुठेतरी इलेक्ट्रॉनिक डिवाईस  दडवून ठेवले आहे. त्यामुळे घरातील प्रत्येक गोष्ट त्याला समजते. अगदी कागदावर किंवा डायरीत  शब्द लिहून केलेले संभाषणदेखील त्याच्यापर्यंत पोहचते.