मजबुतीनं उभं रहायचं असतं, अजित पवारांच्या बंडखोरीवर शरद पवार यांचं भाष्य

अजित पवार सोडून गेले तेव्हा अस्वस्थ वाटलं, पण मजबुतीनं उभं रहायचं असतं अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी दिली. तसेच जनतेवर माझा विश्वास आहे असेही पवार म्हणाले.

बीबीसी मराठीला शरद पवार यांनी मुलाखत दिली. या मुलाखातीत शरद पवार म्हणाले की अजित पवार यांनी जेव्हा पक्ष सोडला तेव्हा धक्का नाही बसला पण अस्वस्थता वाटली. अजित पवार एकटेच नाही गेले पण 25 ते 30 आमदारही त्यांच्यासोबत गेले. जे आमदार सोडून गेले त्यांच्यासाठी मी प्रचार केला, त्यांना निवडणुकीत यश मिळावे म्हणून भाषणं केली, अजित पवारही त्यात होते. हे लोक निवडून आले, या लोकांनी ज्यांच्या विरोधात निवडणूक लढवली आता विधीमंडळात त्यांच्याच दारात बसले हे पाहून अस्वस्थ वाटतं असे पवार म्हणाले.

अस्वस्थ वाटत असली तरी चिंता करायची नसते, मजबुतीनं उभं रहायचं असतं, हिंम्मत दाखवायची असते. जनतेला विश्वास दाखवयचा असतो असे पवार म्हणाले. तसेच जनता शहाणी असते, कुणाचं बरोबर आहे ते विचार करून ते निर्णय घेतात. माझ्या आत्मचरित्राचं नाव लोक माझे सांगाती आहे, जनतेवर विश्वास ठेवायचा असतो असेही पवार म्हणाले.