अल्लू अर्जुन दर रविवारी पोलीस ठाण्यात हजेरी लावणार, नामपल्ली न्यायालयाचे निर्देश

हैदराबाद येथील संध्या थिएटरमधील चेंगराचेंगरी प्रकरणी अभिनेता अल्लू अर्जुनला न्यायालयाने जामीन मंजूर केला. मात्र आरोपपत्र दाखल होईपर्यंत अल्लू अर्जुनला चिकडपल्ली पोलीस ठाण्यात दर रविवारी हजेरी लावण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्लू अर्जुनने आज सकाळी 10.30 वाजता पोलीस ठाण्यात हजर होत पुढील औपचारिकता पूर्ण केली.

न्यायालयाच्या निर्देशानुसार अल्लू अर्जुनला आरोपपत्र दाखल होईपर्यंत दर रविवारी सकाळी 10 ते दुपारी 1 या वेळेत तपास अधिकाऱ्यांसमोर हजर राहावे लागणार आहे. याशिवाय न्यायालयाला न कळवता निवासी पत्ता बदलू नये आणि परवानगीशिवाय परदेशात जाऊ नये, असे निर्देशही अल्लू अर्जुनला दिले आहेत. चेंगराचेंगरी प्रकरणी निर्णय होईपर्यंत अल्लू अर्जुनला या अटी लागू राहतील.

न्यायालयाने 3 जानेवारी 2025 रोजी संध्या थिएटर प्रकरणात अल्लू अर्जुनला नियमित जामीन मंजूर केला. यानंतर न्यायालयाने नियमित जामीन मंजूर केल्यानंतर अल्लू अर्जुनने 4 जानेवारीला नामपल्ली येथील मेट्रोपॉलिटन क्रिमिनल कोर्टात जामिनाची रक्कम जमा केली होती.