
शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांच्या संरक्षणाची जबाबदारी असणाऱ्या पोलीस विभागाने सिटीचौकातील हुतात्मा अनंत कान्हेरे यांचा पुतळा झाकून अनादर केला आहे. मनपाकडून नेहमीच दुर्लक्षित झालेल्या पुतळ्याच्या अस्तित्वाचा प्रश्न निर्माण झालेला असताना आता दयनीय परिस्थितीत असलेला हा पुतळा टॉवरच्या आड लपला आहे.
स्वातंत्र्यासाठी ऐन तारुण्यात बलिदान दिलेल्या हुतात्मा अनंत कान्हेरे यांचा पुतळा अनेक वर्षापूर्वी शहराचे प्रमुख ठिकाण असलेल्या सिटीचौकात उभारण्यात आला. हा अर्धकृती पुतळा येथे उभारल्यापासून मनपाने त्याच्याकडे ढुंकूनही पाहिलेले नाही. रस्त्यावरील वाहतुकीमुळे उडणाऱ्या धुळीचे थर या पुतळयावर आहेत. उघड्यावर असल्याने या पुतळ्यावर पक्ष्यांनीही घाण केली आहे. हे करणार, ते करणार… अशा गप्पा करणाऱ्या मनपा आयुक्त जी. श्रीकांत माध्यमांमधून शहरवासीयांसमोर हीरोगिरी करीत असतात. यातून त्यांना या पुतळ्याकडे लक्ष देण्यासाठी कदाचित वेळ मिळत नसावा.
काही दिवसापूर्वी शहरातील भडकलगेट, टीव्ही सेंटर चौक यासह काही प्रमुख चौकात असलेल्या पुतळ्याच्या भोवतीच्या बेटांचे सुशोभीकरण करण्याचे काम मनपाने हाती घेतले आहे. यावर कोट्यावधी रुपये खर्च होणार आहेत. शहरातील रस्ते, ड्रेनेज, पाणीपुरवठा योजनेसह मूलभूत गरजा असलेल्या कामाप्रमाणे हे कामही कासवगतीने सुरु आहे. कामाची गती पाहता किमान चार ते पाच वर्ष हे काम सुरुच राहील, असे चित्र आहे. शहरातील पुतळ्यांच्या भोवतालीच्या बेटांचे सुशोभीकरण करताना मनपाला हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्याची आठवण झाली नाही. पुतळा आजही आहे तसाच आहे.
दरम्यान, दयनीय परिस्थित असलेल्या पुतळ्याची होत असलेल्या विटंबनेला आता पोलिसांनी हातभार लावला आहे. गणपती विसर्जनासाठी सिटीचौकात मिरवणुकीवर लक्ष ठेवण्यासाठी उभारण्यात आलेला टॉवर अगदी हुतात्मा अनंत कान्हेरे यांच्या पुतळ्यासमोर उभारण्याना आला. हा टॉवर उभारतानां तारुण्यात हौतात्म्य पत्करलेल्या एका देशप्रेमीचा पुतळा झाकला जातोय, याचे सोयरसुतकही पोलीस विभागाला नव्हते. विसर्जन मिरवणूक होऊन चार महिन्याचा कालावधी उलटल्यानंतरही पोलीस विभागाकडून हा टॉवर हटविण्यात आलेला नाही. कुठलेही कारण नसताना हा टॉवर पुतळ्याच्या अगदी समोर उभा आहे.
वास्तविक पाहता शहरातील महापुरुषांच्या पुतळ्यांचे संरक्षण करण्याची जबाबदारी पोलीस विभागाची आहे, मात्र संरक्षण करणे तर सोडा, पोलीस विभागानेच चक्क एका हुतात्म्याचा पुतळा झाकुन आपला कारभार चव्हाट्यावर आणला आहे.