‘हश मनी’ प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी, पॉर्नस्टारने पोलखोल करू नये यासाठी दिले होते पैसे

पॉर्न अभिनेत्रीने ऐन निवडणुकीच्या काळात आपल्या कथित संबंधांबाबत तोंड उघडू नये यासाठी तिला पैसे देणारे अमेरिकेचे माजी राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प या प्रकरणात दोषी असल्याचे न्यूयॉर्क येथील न्यायालयात सिद्ध झाले आहे. या प्रकरणासह एकूण 34 आरोपांखाली ट्रम्प दोषी ठरले आहेत.

पुन्हा राष्ट्राध्यक्षपदासाठी इच्छुक असलेले ट्रम्प यांच्यावर गेली दोन वर्षे या प्रकरणाची टांगती तलवार होती. पॉर्नस्टार स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्याशी पूर्वी असलेल्या संबंधांवर केलेले भाष्य प्रसिद्धीस येऊ नये म्हणून ट्रम्प यांनी 2016च्या अध्यक्षीय निवडणुकीच्या अंतिम टप्प्यात पैसे देऊन तिचे तोंड दाबल्याची बाब न्यायालयात सिद्ध झाली आहे. गुरुवारी या प्रकरणाची तब्बल साडेनऊ तास सलग अंतिम सुनावणी पार पडली. सुनावणीदरम्यान ट्रम्प पूर्णवेळ निर्विकार चेहऱयाने मान खाली घालून बसून होते. मात्र, ज्युरींचे मत सांगण्यासाठी उभ्या राहिलेल्या प्रमुख ज्युरी सदस्याकडे ट्रम्प आशेने पाहत होते. तथापि, कोर्टाने विचारणा केल्यावर त्याने दोषी असा एकच शब्द उच्चारल्यावर ट्रम्प यांनी अतीव निराशेने डोळे गच्च मिटून घेतले.

ट्रम्प यांची चिडचिड

ही सर्व न्यायालयीन प्रक्रियाच सदोष होती. असत्य बाबींचा त्यात भरणा होता, राजकीयदृष्टय़ा प्रेरित होती, अशी चिडचिड ट्रम्प यांनी निकालानंतर व्यक्त केली.

‘हश मनी’ प्रकरण

स्टॉर्मी डॅनियल्सने ट्रम्प यांच्याबरोबर पूर्वी संबंध असल्याचा दावा करून त्यासंबंधीचे काही किस्से आणि आठवणी अमेरिकेतील काही प्रकाशकांकडे प्रसिद्धीसाठी पाठवल्या होत्या. 2016 च्या निवडणूक प्रचारकाळात त्यांना प्रसिद्धी मिळू नये ट्रम्प यांचे सहकारी मायकेल कोहेन यांच्या वतीने 1,30,000 डॉलर्स देण्यात आले. अध्यक्षपदी निवडून आल्यानंतर कधीतरी ट्रम्प यांनी कोहेन यांना ते पैसे परत केले; परंतु ही देयके कोहेन यांचे मानधन म्हणून देण्यात आल्याचे दाखवले गेले. या आर्थिक गैरव्यवहाराचा ठपका ट्रम्प यांच्यावर ठेवण्यात आला होता. सामान्यतः एखादे प्रकरण दडपण्यासाठी केलेला आर्थिक गैरव्यवहार हा फौजदारी स्वरूपाचा गुन्हा ठरतो.

ट्रम्प यांची निवडणूक शिक्षेच्या स्वरूपावर अवलंबून

ट्रम्प यांनी सध्या अध्यक्षीय निवडणुकीसाठी मोर्चेबांधणी केली आहे. ही शिक्षा 11 जुलै रोजी सुनावली जाण्याची शक्यता आहे. ज्या प्रकरणात डोनाल्ड ट्रम्प दोषी आढळले आहेत त्या प्रकरणासाठी न्यूयॉर्कमध्ये किमान 4 वर्षांच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरतूद आहे. ट्रम्प यांच्यावर याआधी कोणताही गंभीर गुन्हा नोंद झालेला नाही. त्यामुळे ट्रम्प यांना किरकोळ तुरुंगवास किंवा प्रोबेशनवर पाठवणी अशा स्वरूपाचा निर्णय कोर्ट घेऊ शकते. पण, दोषी व्यक्तीला निवडणूक लढवण्यास मनाई करणारी तरतूद न्यूयॉर्कच्या कायद्यांमध्ये नाही. त्यामुळे ट्रम्प निवडणूक लढवू शकतील.