देवदर्शनाहून परतणाऱ्या कुटुंबावर काळाची झडप, आई-वडिलांसह मुलगा ठार; बहीण, मेहुणा गंभीर जखमी

अंधानेर (ता. कन्नड) येथे बाळूमामा यांच्या पालखीची पहाटेची आरती करून वाळूजच्या दिशेने घराकडे येणाऱ्या कुटुंबाच्या कारला फतियाबाद येथे अपघात झाला. या अपघातात आई- वडिलांसह एकुलत्या एक मुलाचा मृत्यू झाला. हा अपघात धुळे- सोलापूर राष्ट्रीय महामार्गावरील फतियाबाद परिसरात समृद्धी महामार्गाच्या उड्डाणपुलाखाली शनिवारी पहाटे 5 वाजता झाला.

वाळूज येथील राजू आसाराम उचित (वय – 60), अल्काबाई राजू उचित (वय – 55), मुलगा अर्जुन राजू उचित (वय – 25, सर्व रा. लाईननगर, वाळूज), मुलगी आरती व जावई किरण दहितुले हे सर्व जण अंधानेर येथे देवदर्शनासाठी गेले होते. राजू उचित यांचे वाळूजमधील लाईननगर भागात किराणा दुकान आहे. कन्नड तालुक्यातील अंधानेर येथे बाळूमामा यांच्या मेंढ्या आल्यामुळे तेथे पालखीचे दर्शन व पहाटे तीनची आरती करण्यासाठी राजू उचित हे आपल्या कुटुंबीयांसह शुक्रवारी रात्री साडे अकरा वाजेच्या सुमारास कार (क्र. एमएच 01 बीबी 7333) ने कन्नड येथील अंधानेर येथे गेले होते.

रात्री 11 वाजता निघाल्यानंतर पहाटे अंधानेर येथे हे कुटुंब पोहचले होते. उचित कुटुंबातील तीन सदस्य व उचित यांची मुलगी आणि जावई असे पाच जण कारमधून प्रवास करीत होते. आरती झाल्यानंतर हे पाचही जण कारमधून शहराकडे येत होते. कार चालविणाऱ्या अर्जुन उचित याचा ताबा सुटल्याने ही कार रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या ट्रकच्या पाठीमागून आदळली. गाडीचा वेग जास्त असल्याने, कारचा दर्शनी भाग चक्काचूर झाला.

या अपघातात कार चालविणारा अर्जुन उचित, त्याचे वडील राजू उचित आणि आई अल्काबाई उचित हे तिघे जण गंभीर जखमी झाले. त्यांना घाटी रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले असता डॉक्टरांनी तिघांना मृत घोषित केले, तर राजू उचित यांची मुलगी आरती दहितुले व जावई किरण दहितुले हे गंभीर जखमी झाले. त्यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू असल्याची माहिती पोलीस उपनिरीक्षक कृष्णा घायाळ यांनी दिली.

दरम्यान, अर्जुन उचित याचा चार महिन्यांपूर्वी विवाह झाला होता. सुनेची तब्येत बरोबर नसल्याने उचित कुटुंबीयांनी तिला घरी राहण्याचा सल्ला दिला. तर सोबत जाण्यासाठी मुलगी आरती व जावई किरण यांना बोलावून घेतले होते. त्यांना सोबत घेऊन ते अंधानेर येथे गेले होते. परत येत असताना अशी दुर्दैवी घटना घडल्याने वाळूज गावातून हळहळ व्यक्त होत आहे.