बंगळुरूत पत्नीचा खून करून मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला, पतीचा आत्महत्येचा प्रयत्न; पोलिसांनी केले जेरबंद

बंगळुरूमध्ये पत्नीसोबत झालेल्या वादातून पतीने तिच्यावर चाकूने वार करून खून केला. त्यानंतर तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबून आरोपीने पुण्यात पलायन केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. यादरम्यान, त्याने सासू-सासऱ्यांसह आई-वडिलांना फोन करून पत्नीचा खून केल्याचे सांगितले. मोटारीतून शिरवळ परिसरात येऊन तरुणाने विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, पोलिसांनी त्याला भारती हॉस्पिटलनंतर ससून सर्वेपचार रुग्णालयात दाखल केले होते. त्यानंतर बंगळुरू पोलिसांनी पुण्यातून आरोपीचा ताबा घेतला आहे. राकेश खेडेकर असे आरोपीचे नाव आहे. गौरी खेडेकर-सांबेकर (32) असे खून झालेल्या महिलेचे नाव आहे.

आयटी फर्ममध्ये प्रोजेक्ट मॅनेजर असलेल्या राकेशचा गौरीशी दोन वर्षांपूर्वी प्रेमविवाह झाला होता. कामानिमित्त दोन महिन्यांपूर्वीच दोघेही बंगळुरूमध्ये शिफ्ट झाले होते. कौटुंबिक वादातून दोघांमध्ये वारंवार वाद होत होते. त्या पार्श्वभूमीवर महिलेच्या तक्रारीनुसार बंगळुरू पोलिसांनी दोघांची समजूत घालत वाद मिटवला होता. मात्र, दोन दिवसांपूर्वी दोघांमध्ये पुन्हा वाद झाल्याने संतापलेल्या राकेशने गौरीवर चाकूने वार केले. तिचा खून केल्यानंतर गौरवने तिचा मृतदेह सुटकेसमध्ये कोंबला. त्यानंतर त्याने पत्नीची हत्या केल्याची माहिती सासू-सासऱ्यासह आई-वडिलांनाही दिली. मोटारीने प्रवास करून त्याने बंगळुरूमधून पलायन करून शिरवळ गाठले. त्या ठिकाणी त्याने झुरळ मारण्याचे औषध पिऊन आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यामुळे तो शिरवळच्या जवळपास बेशुद्ध झाला. स्थानिकांनी याची माहिती पोलिसांना दिल्यानंतर पोलिसांनी तपासणी केली. त्याला भारती हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी दाखल केले.