लग्नात मानपान केला नाही म्हणून विवाहितेचा शारीरिक व मानसिक छळ सुरू होता. पतीसह सासरच्या मंडळींनी लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे विवाहितेचा गर्भपात झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी पतीसह चौघांवर गुन्हा दाखल केला आहे.
तेहसीन जुनेद तांबोळी (वय 25, सध्या रा. कसबे डिग्रज, ता. मिरज) या विवाहितेच्या तक्रारीनुसार शहर पोलिसांनी पती जुनेद मुसा तांबोळी (वय 30), दुल्हन मुसा तांबोळी (वय 45), मुसा महंमदगौस तांबोळी (52), तबस्सूम मुसा तांबोळी (वय 36, सर्व रा. श्यामरावनगर) यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे.
तेहसीन व जुनेद यांचा विवाह झाला होता. लग्नात तेहसीनच्या आई-वडिलांनी मानपान केला नाही, असे म्हणत, ‘माहेरहून एक लाख रुपये घेऊन ये; नाहीतर त्या किमतीचे सोने घेऊन ये,’ असा तगादा संशयितांनी लावला होता. त्यासाठी तेहसीनचा मानसिक व शारीरिक छळ करण्यात आला. या कालावधीत तेहसीन गर्भवती होती. ‘हे मूल नको’ म्हणून गर्भपात करण्यासाठीही संशयितांनी तिच्यावर दबाव टाकला. या छळाला कंटाळून तेहसीन माहेरी आली. संशयित चौघांनीही माहेरी येऊन तेहसीन व तिच्या आईला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यामुळे तिचा गर्भपात झाल्याची फिर्याद तेहसीन याने दिली आहे. गर्भपात करण्यास चौघे कारणीभूत असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.