पत्नीने झाडूने मारणे ही क्रूरता नव्हे! कोलकाता हायकोर्टाने पतीला घटस्फोट नाकारला

पत्नीने पतीला झाडूने मारणे ही क्रूरता ठरत नाही, असा महत्वपूर्ण निर्णय कोलकाता उच्च न्यायालयाने दिला आहे. पत्नी झाडूने मारते म्हणून पतीने पत्नीपासून घटस्फोट मागत कुटुंब न्यायालयात धाव घेतली होती. त्यावर कुटुंब न्यायालयाने क्रूरतेच्या आधारे घटस्फोट मंजूर केला होता. तो आदेश उच्च न्यायालयाने रद्द केला आणि पतीला घटस्फोट देण्यास नकार दिला.

पतीच्या याचिकेवर उच्च न्यायालयात सुनावणी झाली, तेव्हा आपला सुखी संसार सुरु असल्याचे प्रतिवादी पत्नीने न्यायालयाच्या निदर्शनास आणले. दोघे सुखाने नांदत असल्याचे सांगून तिने पतीचा क्रूरतेचा दावा धुडकावून लावला. पत्नी झाडूच्या साहाय्याने मारझोड करते व अन्य प्रकारे त्रास देते, असा आरोप पतीने कनिष्ठ न्यायालयात केला होता.

पतीने केलेले आरोप कनिष्ठ न्यायालयाने ग्राह्य धरले आणि पतीच्या बाबतीत क्रूरता झाल्याचा निष्कर्ष काढला होता. मात्र उच्च न्यायालयाने कनिष्ठ न्यायालयाचा निर्णय फिरवला. क्रूरतेचा निष्कर्ष अशाप्रकारे स्वतंत्रपणे काढू शकत नाही, असा निर्वाळा उच्च न्यायालयाने दिला.

तसेच पत्नीची पतीसोबत नांदण्याची इच्छा विचारात घेत न्यायालयाने घटस्फोटाचा आदेश रद्द केला. पत्नीने कुठल्या दिवशी, कुठल्या वेळी छळवणूक केली, याचा पतीने घटस्फोटाच्या याचिकेत उल्लेख केला नसल्याचे निरीक्षण न्यायमूर्ती हरिष टंडन यांच्या खंडपीठाने नोंदवले.