आत्महत्या, हत्येचा गुन्हा सिद्ध करण्यात पोलीस अपयशी; हायकोर्टाने पतीची केली निर्दोष सुटका

एका महिलेने कौटुंबिक हिंसाचारामुळे आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे पोलीस सिद्ध करू शकले नाहीत. त्यामुळे उच्च न्यायालयाने या महिलेच्या पतीची निर्दोष सुटका केली.

याप्रकरणात पत्नीने गळफास घेतला. सुरुवातीला हुंडाबळीचा गुन्हा नोंदवण्यात आला. नंतर पतीविरेधात हत्येचा आरोप ठेवण्यात आला. कल्याण सत्र न्यायालयाने पतीला पत्नीच्या हत्येसाठी दोषी धरत जन्मठेपेची शिक्षा ठोठावली. त्याविरोधात त्याने अपील याचिका दाखल केली.

न्या. सारंग कोतवाल व न्या. एस. एम. मोडक यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी झाली. सरकारी पक्ष पती विरोधातील कोणताच गुन्हा सिद्ध करू शकला नाही, असा ठपका ठेवत खंडपीठाने कल्याण सत्र न्यायालयाचा निकाल रद्द केला व पतीची निर्दोष सुटका केली.

पतीने वाचविण्याचा प्रयत्न केला

पत्नीने गळफास घेतल्यानंतर पतीने तिला वाचविण्याचा प्रयत्न केला. पण त्याआधीच तिचे निधन झाले होते. पतीने सोन्याच्या अंगठीची मागणी केली होती. सासऱ्याने त्याला अंगठी दिली होती. पतीने तीन लाख रुपयांसाठी तगादा लावला होता. या जाचाला पंटाळून पत्नीने आत्महत्या केली हे सिद्ध होऊ शकले नाही, असे खंडपीठाने स्पष्ट केले. रमाकांत पाटील, असे सुटका झालेल्या आरोपीचे नाव आहे. पत्नी गर्भधारणा होत नसल्याने तणावात होती. त्यातूनच तिने आत्महत्या केली, असा दावा पतीने केला. पतीच्या भावाच्या पत्नीनेही असाच जबाब दिला होता. तो न्यायालयाने ग्राह्य धरला. पतीने केलेला दावा खोटा आहे. ही हत्या असल्याचा कल्याण सत्र न्यायालयाचा निष्कर्ष योग्य आहे, असा युक्तिवाद सरकारी पक्षाने केला. तो खंडपीठाने फेटाळून लावला.