अमेरिकेत ‘हेलेन’ चक्रीवादळाचं थैमान, 93 लोकांचा मृत्यू; वीजपुरवठा खंडीत झाल्याने नागरिकांचे हाल

अमेरीकेत हेलेन वादळाने तिन दिवसांपासून हाहाकार माजवला आहे. ज्यामध्ये आतापर्यंत 93 लोकांचा मृत्यू झाला आहे. लाखो लोकं वीजपुरवठा खंडीत झाल्याने त्रस्त झाले आहेत आणि अनेक कुटुंब पुराच्या पाण्यात फसले आहेत. तर 600 जण बेपत्ता आहेत.

संयुक्त राज्य अमेरिकेच्या दक्षिण कॅरोलिना, जॉर्जिया, फ्लोरिडा, उत्तरी कॅरोलिना, वर्जिनिया आणि टेनेसी मध्ये अनेकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळाली आहे. काऊंटी आणि राज्याच्या अधिकाऱ्यांच्या माहितीनुसार, उत्तरी कॅरोलिनामध्ये कमीत कमी 36 लोकांचा मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी सांगितले की, दक्षिम कॅरोलिनामध्ये 25 लोकांचा मृत्यू झाला, ज्यामध्ये सलुडा काऊंटीचे दोन अग्निशमन दलाचे कर्मचारी होते. जॉर्जीयामध्ये कमीत कमी 17 लोकांचा मृत्यू झाला.उत्तर कॅरोलिनामध्ये, काउंटी आणि राज्य अधिकाऱ्यांनी 36 मृत्यूची पुष्टी केली आहे, तर फ्लोरिडामध्ये किमान 11 लोकांचा मृत्यू झाला आहे.

गव्हर्नर रॉन डीसँटिस यांनी शनिवारी सांगितले की, पिनेलास काउंटीमधील अनेक जणांचा बुडून मृत्यू झाला आहे. अधिकाऱ्यांनी रविवारी सांगितले की, व्हर्जिनियामध्ये दोन लोकं ठार झाले आणि टेनेसीमध्ये दोन लोकांचा मृत्यू झाल्याचे सीएनएनने वृत्त दिले. बनकॉम्बे काउंटी, नॉर्थ कॅरोलिना यांना ऑनलाइन फॉर्मद्वारे सुमारे 600 लोकं बेपत्ता असल्याचे अहवाल प्राप्त झाले आहेत, असे काउंटी व्यवस्थापक एव्हरिल पिंडर यांनी रविवारी सांगितले.

दरम्यान अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन यांनी आश्वासन दिले आहे की, हेलन चक्रिवादळामुळे प्रभावित झालेल्या समुदायांना आवश्यक ती मदत करण्यासाठी प्रशासन राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांशी समन्वय साधण्याचा प्रयत्न करत आहेत. सोशल मीडिया साईट एक्सवर पोस्ट शेअर करत जो बायडेन म्हणाले की, ‘हेलेन’ चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर माझ्या कार्यसंघाकडून माहिती दिली जात आहे आणि माझे प्रशासन राज्य आणि स्थानिक अधिकाऱ्यांसह समुदायांना आवश्यक मदत पुरविण्यासाठी त्यांच्या संपर्कात आहेत. बायडेन म्हणाले की, ‘जील’ आणि ‘हेलन’ चक्रीवादळात प्रियजन गमावलेल्यांसाठी आणि ज्यांची घरे, व्यवसाय आणि समुदाय या भयानक वादळामुळे प्रभावित झालेल्यांसाठी प्रार्थना करत असल्याचे बायडेन म्हणाले.