शेकडो डॉक्टर-प्राध्यापकांची कमतरता, आरोग्यसेवकांची कमतरता, एमआरआर, एक्स-रे, सोनोग्राफी, सिटीस्पॅन मशीनसह औषध-इंजेक्शनच्या कमतरतेमुळे पालिकेचे परळ येथील केईएम रुग्णालय अक्षरशः आजारी असल्याची स्थिती निर्माण झाली आहे. यामुळे या ठिकाणी मुंबईसह राज्यभरातून येणाऱया गोरगरीब रुग्णांचे हाल होत असून आर्थिक भुर्दंड बसत आहे. शिवसेनेने या केईएम रुग्णालयावर धडक देत आज गैरसोयींचा पर्दाफाश केला.
केईएम रुग्णालयातील रुग्णांच्या अहवालांचा वापर करून डीश बनवण्यात आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्यानंतर आज शिवसेना शिष्टमंडळाने केईएम रुग्णालयावर धडक देत प्रशासनाला धारेवर धरले. यावेळी आमदार अजय चौधरी, माजी महापौर किशोरी पेडणेकर, श्रद्धा जाधव, माजी नगरसेवक अनिल कोकीळ, माजी नगरसेविका सिंधू मसुरकर आदी उपस्थित होते. यावेळी बोलताना अजय चौधरी यांनी रुग्णालयांतील गैरसोयींचा पाढाच वाचला. अजय चौधरी म्हणाले, केईएम रुग्णालयातील गैरसोयींबाबत शिवसेना शिष्टमंडळाने दहा महिन्यांपूर्वी रुग्णालयावर आंदोलन करीत प्रशासनाला जाब विचारला होता. यावेळी अतिरिक्त आयुक्त डॉ. सुधाकर शिंदे यांनी शिवसेना शिष्टमंडळाशी चर्चा करून सर्व गैरसोयी अवघ्या दोन महिन्यांत दूर करण्याचे आश्वासन दिले होते, मात्र आता दहा महिन्यांत एका सीटीस्पॅन मशीनव्यतिरिक्त या ठिकाणी कोणतीही नवी सुविधा निर्माण झाली नाही. गेल्या दोन वर्षांपासूनच केईएम रुग्णालयाची ही दुर्दशा झाल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.
अशा आहेत गैरसुविधा
पालिकेत सध्या आरोग्य समिती, स्थायी समिती नसल्याने पालिका अधिकाऱयांवर अंकुश नाही. त्यामुळे प्रशासनाचे मनमानी काम. एमआरआय मशीन नाही. सीटीस्पॅन, सोनोग्राफी अत्यंत तुटपुंज्या. पॅथॉलॉजी, मर्च्युरीत झेरॉक्स नाही. पुरेशा व्हिलचेअर, स्ट्रेचर नाहीत.
बेडची प्रचंड कमतरता. काही वॉर्ड दुरुस्तीच्या नावाखाली महिनोन् महिने बंद असल्याने प्रचंड गैरसोय. रुग्णालयात साधे कुत्रा चावल्यानंतर द्यावयाच्या रेबीज प्रतिबंधक इंजेक्शन नाही. बहुतांशी चाचण्या बाहेरून कराव्या लागतात.
डॉक्टर प्राध्यापक हवेत 106 – आहेत 67, तब्बल 39 ची कमतरता. सहप्राध्यापक हवेत 168, आहेत 115 आहेत, कमतरता 53. असिस्टंट प्रोफेसर हवेत 284, भरलेत 82, कमतरता तब्बल 202 पदे भरलेली नाही. नर्सेस हव्यात 1200, तब्बल 174 कमी.
उपायुक्तांची चौकशी समिती
केईएम रुग्णालयातील रुग्ण अहवालांच्या आवरण (फोल्डर) चा वापर करून कागदी डीश तयार करण्यात आल्याप्रकरणी आता पालिकेने सार्वजनिक आरोग्य उपायुक्त यांची एकसमस्यीय चौकशी समिती नेमली आहे. सेवा पुरवठादाराने आवरणांचे तुकडे न करताच निष्काळजीपणाने ही रद्दी हाताळल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे.