फुटबॉलच्या दंगलीत शेकडो चाहते मृत्युमुखी, क्रीडाविश्वाला हादरवणारी दुर्दैवी घटना

पश्चिम आफ्रिकेतील गिनीमधील जेरेकोर शहरात एका फुटबॉल सामन्यादरम्यान रेफरींच्या वादग्रस्त निर्णयामुळे उभय संघातील खेळाडूंमध्ये झालेल्या हाणामारीचे दंगलीत रूपांतर झाले आणि या दंगलीत मैदानात उपस्थितीत असलेल्या चाहत्यांनीही घुसखोरी केली. त्यामुळे उसळलेल्या दंगलीत शंभरहून अधिक फुटबॉलप्रेमींनीच एकमेकांचे जीव घेतले. फुटबॉलच्या इतिहासातील या अत्यंत दुर्दैवी आणि हिंसक घटनेने अवघे क्रीडाविश्व हादरले आहे. या हिंसाचारात हजारोंच्या संख्येने लोक जखमीही पडले आहेत. जेरेकोर शहरातील लाबे व जेरेकोर या संघांमध्ये सुरू असलेल्या सामन्यादरम्यान हा दुर्दैवी राडा घडला.

सामन्यादरम्यान रेफरींनी एक वादग्रस्त निर्णय दिला. त्यामुळे लाबे व जेरेकोर या दोन्ही संघांतील खेळाडूंमध्ये हाणामारी सुरू झाली. ही हाणामारी बघून प्रेक्षकही मैदानात घुसले अन् मग दंगलीला सुरुवात झाली. ही दंगल इतकी वाढली की, फुटबॉलशौकिनांनी शेजारीच असलेल्या एका पोलीस स्टेशनचीही तोडफोड करून आग लावली. स्थानिक मीडियाने दिलेल्या माहितीनुसार या राड्यात शेकडो जण मारले गेले. अनेक रुग्णालयांत मृतदेहांचा अक्षरशः खच पडला होता. शवागृहे गच्च भरल्याने रुग्णालयाबाहेर व गल्लीमध्ये मृतदेह पडल्याचे विदारक दृश्य दिसत होते.

हा फुटबॉल सामना गिनी सैन्यदलाच्या आर्मी जनरल मामाडी डोम्बौया यांच्या सन्मानार्थ आयोजित करण्यात आला होता. डोम्बौया यांनी 2021मध्ये गिनी देशात सत्तापालट करून स्वतःला आर्मी जनरल म्हणून घोषित केले होते. देशात निवडणुका घेण्यापूर्वी प्रसिद्धी मिळविण्यासाठी देशातील विविध शहरांमध्ये त्यांनी फुटबॉल स्पर्धांचे आयोजन केले होते; मात्र या फुटबॉल स्पर्धेदरम्यानच हिंसाचार उफाळल्याने अनेकांना आपले प्राण गमवावे लागले.