2019 मध्ये कोरोनाने हाहाकार माजवल्यानंतर तब्बल पाच वर्षांनी चीनमध्ये पुन्हा एकदा नवीन विषाणूने डोके वर काढले आहे. त्यामुळे जगावर आणखी एका महामारीचे संकट घोंघावत आहे. ह्युमन मेटान्युमोव्हायरस या नव्या विषाणूचा संसर्ग चीनमध्ये झपाट्याने वाढत असून त्याची लक्षणे कोरोनासारखीच आहेत. या विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांनी रुग्णालये ओव्हरफ्लो झालीत आणि स्मशानात मृतदेहांचा खच पडला, किंकाळ्या आणि आक्रोश असे भयाण चित्र दर्शवणारा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. मात्र, चीनने याला अधिकृत दुजोरा दिलेला नाही. असे असले तरीही हिंदुस्थानातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर गेल्या असून चीनच्या शेजारील सर्वच देशांचे टेन्शन प्रचंड वाढले आहे.
रुग्णांच्या गर्दीचे फोटो पोस्ट करत चीनमध्ये अनेक ठिकाणी आणीबाणी जाहीर करण्यात आल्याचा दावा सोशल मीडियावरून करण्यात आलेल्या पोस्टमध्ये करण्यात आला आहे. या दाव्यानुसार रुग्णालयांत गर्दी आणि स्मशानात मृतदेहांचा खच वाढत आहे. चीनकडून मात्र अशी कोणतीही माहिती देण्यात आलेली नाही. जागतिक आरोग्य संघटनेनेही अद्याप सूचना जारी केलेली नाही.
विषाणू गंभीर, पण पॅनिक होऊ नका!
मेटान्युमोव्हायरसबद्दल चीनमधून बातम्या येत आहेत. या विषाणूचे पसरणे चिंताजनक असले तरी पॅनिक होण्याची गरज नाही. आवश्यक ती काळजी घ्यावी असे जनरल ऑफ हेल्थ सर्व्हिसेसचे संचालक डॉ. अतुल गोयल यांनी आज सांगितले.
मेटान्यूमोव्हायरस कसा हल्ला करतो?
कोरोना फुप्फुसांवर परिणाम करतो, परंतु ह्युमन मेटान्युमोव्हायरस मानवी श्वसनमार्गालाही संक्रमित करतो. हा विषाणू शिंकण्याने आणि खोकल्याने वेगाने पसरतो. त्यामुळे याचा संसर्ग प्रचंड वेगाने होतो. हिवाळ्यात त्याचे रुग्ण झपाट्याने वाढत असल्याचे समोर आले आहे.
हिंदुस्थानातील आरोग्य यंत्रणा अलर्ट मोडवर
राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राकडून केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या नेतृत्वाखाली एन्फ्ल्युएन्झाशी संबंधित प्रकरणे तपासली जात आहेत. तसेच आंतरराष्ट्रीय आरोग्य संघटनांशीही संपर्कात असल्याचे वृत्त एनएनआय या वृत्तसंस्थेने आरोग्य अधिकाऱ्यांच्या हवाल्याने दिले आहे. याप्रकरणी अधिकृत माहिती गोळा करण्यात येत असून आम्ही कोरोनासदृश विषाणूशी संबंधित आजारांवर लक्ष ठेवून आहोत, असे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे.
सर्वाधिक धोका कुणाला
ज्येष्ठ नागरिक आणि 5 वर्षांखालील मुलांना, गर्भवती महिला तसेच ज्यांची रोगप्रतिकार शक्ती कमी आहे किंवा ज्यांना अनेक जुने आजार आहेत अशांना या विषाणूचा सर्वाधिक संसर्ग पटकन होऊ शकतो. या विषाणूवर अद्याप लस विकसित करण्यात आलेली नाही. त्यामुळे या विषाणूशी लढणे सध्या तरी कठीण आहे.
आजाराची लक्षणे कोणती
ह्युमन मेटान्युमोव्हायरसची लक्षणे खोकला, ताप, नाक बंद होणे आणि घशात घरघर अशी आहेत. या विषाणूशिवाय इन्फ्लुएंझा ए, मायकोप्लाझ्मा न्यूमोनिया आणि कोविड-19ची प्रकरणेही नोंदवली जात आहे. त्यामुळे रुग्णांची संख्या सातत्याने वाढत असल्याचे चीनमधील विषाणू संसर्गाबद्दल प्रसिद्ध झालेले व्हिडीओ आणि बातम्यांवरून समोर आले आहे.
कशामुळे पसरतो
खोकल्यामुळे तसेच शिंकण्याने ह्युमन मेटान्युमोव्हायरस हा विषाणू पसरण्याचा धोका अधिक आहे. जर या विषाणूचा प्रभाव तीव्र असेल तर ब्राँकायटिस आणि न्यूमोनियाचाही धोका वाढू शकतो. या विषाणूचा सामना करण्यासाठी चीन एका पाळत ठेवण्याच्या यंत्रणेचीही चाचणी करत आहे.
काय काळजी घ्यावी…
- सातत्याने हात धुवत राहा
- मास्क वापरा, गर्दीत जाणे टाळा
- सर्दी, खोकला, ताप असलेल्या रुग्णांच्या संपर्कात जाऊ नका
- लक्षणे दिसल्यास तत्काळ उपचार घ्या
- कोरोना प्रतिबंधक लस घेतली नसेल तर ती आधी घ्यावी
- पोषक आहार घ्यावा. मद्यपान, धूम्रपान टाळावे