मुंबई महानगरपालिकेच्या एफ/दक्षिण विभागात गेल्या अनेक दिवसांपासून पुरेसा पाणीपुरवठा होत नसल्याने रहिवाशांची प्रचंड गैरसोय होत आहे. याबाबत शिवसेनेच्या माध्यमातून वारंवार पाठपुरावा करूनही पालिका प्रशासन दुर्लक्ष करीत असल्यामुळे आज संतप्त लालबाग, परळ आणि काळाचौकीवासीयांनी पालिकेच्या एफ/दक्षिण विभाग कार्यालयावर जोरदार धडक देत प्रमुख जलअभियंत्यांसह अधिकाऱ्यांना घेराव घालून जाब विचारला.
लालबाग, परळ आणि काळाचौकीसह परिसरात गेल्या अनेक महिन्यांपासून पाण्याची बोंब सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना नेते-खासदार अरविंद सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली तीन महिन्यांपूर्वी आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एफ/दक्षिण विभागाचे शिवडी विधानसभेतील सर्व नगरसेवकांसमवेत जल अभियंता कार्यालय, वरळी येथे एफ/दक्षिण विभागात होत असलेल्या अपुऱ्या पाणीपुरवठ्य़ाबाबत बैठक झाली. यामध्ये आठ दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत होईल असे पालिकेने आश्वासित केले होते, परंतु पाणीपुरवठय़ात काहीही सुधारणा झाली नाही. त्यामुळे आमदार अजय चौधरी यांच्या नेतृत्वाखाली एफ/ दक्षिण विभाग कार्यालयावर भव्य हंडा मोर्चा आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी एफ/दक्षिण विभागाचे सहाय्यक आयुक्त पाटील आणि उपजल अभियंता खिल्लारी यांनी चार दिवसांत पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत बैठक घेऊन नियोजन करू, असे आश्वासित केले होते, मात्र आजपर्यंत पाणीपुरवठा सुरळीत झाला नाही. त्यामुळेच आज अजय चौधरी यांच्या सूचनेनुसार माजी नगरसेवक, बेस्ट समिती अध्यक्ष अनिल कोकीळ यांनी प्रभाग क्रमांक 202 आणि 204 येथील नागरिक आणि पदाधिकाऱयांसमवेत जल अभियंता माळवदे यांच्या कार्यालयात त्यांना घेराव घालून पाणीपुरवठा तत्काळ सुरळीत करण्याची मागणी केली.
तातडीने पाणीपुरवठा सुरळीत होणार
शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) आंदोलनात तब्बल दोन पास प्रशासनाला धारेवर धरण्यात आले. या चर्चेनंतर जल अभियंत्यांनी तातडीने पाणीपुरवठा सुरळीत करण्याबाबत शिष्टमंडळासमोरच दूरध्वनीद्वारे आदेश दिल्याचे अनिल कोकीळ यांनी सांगितले. यावेळी शाखाप्रमुख विजय इंदुलकर, किरण तावडे, कांचन घाणेकर, प्रवीण पाठक, प्रकाश, विलास कुडतरकर, तानाजी बागल, गणेश रुके, राजन आबिटकर, प्रदीप पाताडे, मंगेश पिंगळे, मधुकर नरे, मनोज वाघरे, सुनीता सावंत, मिलिंद वासकर, पुंडलिक सावंत, रमेश रजपूत, प्रशांत गुलगुले, बबन सकपाळ, राजन पार्टे, अजय महाडिक, मंगेश चव्हाण, अमोल दळवी, खानविलकर, प्रकाश सावंत, अरविंद आडविलकर, सुबोध सावंत, घोसाळकर आणि पदाधिकारी, रहिवासी उपस्थित होते.