देशभरात डिजिटल अरेस्टच्या भीतीची टांगती तलवार डोक्यावर आहे. बँकिंग ग्राहकांच्या फसणुकीच्या घटनेत मोठी वाढ झाली आहे. गेल्या वर्षीच्या तुलनेत चालू आर्थिक वर्षातील पहिल्या सहामाहीत फसवणुकीच्या 18 हजार 461 घटना उघडकीस आल्या असून यातून 21 हजार 367 कोटी रुपयांची फसवणूक झाल्याची आकडेवारी रिझर्व्ह बँकेने जाहीर केलेल्या अहवालातून समोर आली आहे.
रिझर्व्ह बँकेने देशातील बँकिंग क्षेत्राचा अहवाल जाहीर केला आहे. त्यात व्यावसायिक बँका, सहकारी बँका आणि बिगर बँकिंग वित्तीय संस्थांचा समावेश आहे. या अहवालानुसार, चालू आर्थिक वर्षात एप्रिल ते सप्टेंबर कालावधीत फसवणुकीची 18 हजार 461 प्रकरणे घडली असून, त्यात 21 हजार 367 कोटी रुपयांची फसवणूक झाली आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत फसवणुकीची 14 हजार 480 प्रकरणे घडली होती आणि त्यात 2 हजार 623 कोटी रुपयांची फसवणूक झाली होती. गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा फसवणुकीच्या रकमेत आठ पट वाढ नोंदविण्यात आली आहे.