मेगाब्लॉकमुळे मुंबईकर खोळंबले, लोकलचे वेळापत्रक कोलमडले;  रेल्वे स्थानकांत मोठी गर्दी

रेल्वे प्रशासनाने रविवारी लोकलच्या तीनही मार्गांवर मेगाब्लॉक घेतल्याने मुंबईकरांचा जागोजागी खोळंबा झाला. सकाळी 10 वाजल्यापासून सायंकाळी 4 वाजेपर्यंत लोकलचे वेळापत्रक कोलमडले. यात अनेक लोकल फेऱ्या रद्द झाल्याने प्रमुख रेल्वे स्थानकांत प्रवाशांची मोठी गर्दी झाली. कुटुंबीयांसह फिरायला घराबाहेर पडलेल्या मुंबईकरांचे ब्लॉकमुळे प्रचंड हाल झाले.

मध्य रेल्वेच्या मेन लाईनवर ठाणे ते कल्याणदरम्यान तसेच ट्रान्स हार्बर मार्गावर ठाणे ते वाशी/नेरूळ स्थानकांदरम्यान मेगाब्लॉक घेण्यात आला. सायंकाळी पावणेचारच्या सुमारास हा ब्लॉक संपूनही रात्रीपर्यंत लोकल गाड्या उशिराने धावत होत्या. लांब पल्ल्याच्या एक्प्रेसनाही विलंब झाला. ट्रान्स हार्बर मार्गावरील लोकल सेवा सकाळी 10.35 ते दुपारी 4.07 वाजेपर्यंत बंद राहिल्याने प्रवाशांना इच्छित ठिकाणी जाण्यासाठी बस, रिक्षाचा आधार घ्यावा लागला.

मध्य रेल्वेप्रमाणेच पश्चिम रेल्वेचे वेळापत्रक कोलमडले. सांताक्रुझ ते गोरेगावदरम्यान अप-डाऊन जलद मार्गावर पाच तासांचा जम्बो ब्लॉक घेण्यात आला. या काळात जलद गाड्या धीम्या मार्गावर वळवण्यात आल्या. त्याचा परिणाम लोकलच्या संपूर्ण वेळापत्रकावर झाला. लोकलना खचाखच गर्दी झाल्याने अनेक कुटुंबीय रेल्वे स्थानकांतून बस प्रवासाकडे वळले. भरउन्हात ही धावपळ करावी लागल्याने मुंबईकरांची दमछाक झाली.