
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातील आंगणेवाडी श्री भराडी देवीच्या यात्रोत्सवास शनिवार दिनांक 22 फेब्रुवारी रोजी सुरुवात झाली. दोन दिवस चालणाऱ्या या यात्रेत पहिल्या दिवशी लाखो भाविकांनी उपस्थिती दर्शविली. नवस फेडून, माय माऊली आम्हा लेकरांवर तुझी निरंतर पृपादृष्टी राहूदे असे साकडे घातले. यात्रोत्सवात भक्ताच्या गर्दीचा उचांक वाढत होता. भक्तांना सुलभतेने देवीचे दर्शन व्हावे यासाठी दहा रांगांचे नियोजन केल्याने भाविकांना सुलभ दर्शन होत होते. आंगणे पुटुंबीय व ग्रामस्थ मंडळ तसेच प्रशासनाच्या सुयोग्य नियोजनामुळे या वर्षीचा यात्रोत्सव सुरळीत पार पडला.
यावेळी माजी आमदार वैभव नाईक, आमदार अनिल परब, बृहन्मुंबई माजी सुधार समिती अध्यक्ष सदा परब, माजी पंचायत समिती सदस्य महेश बागवे, जेट एअरवेजचे हिमराज सावंत, दीपक लिंगायत, श्रीपृष्ण बागवे, आनंद तांबे, सुगंध तांबे, आंगणेवाडी मंडळाचे अध्यक्ष छोटू आंगणे, दिनेश आंगणे, जिल्हाधिकारी अनिल पाटील, जिल्हाधिकारी प्रांताधिकारी ऐश्वर्या काळूशे, जिल्हा पोलीस अधीक्षक सौरभ अग्रवाल, मालवण तहसीलदार वर्षा झालटे आदी तसेच मान्यवर पहिल्या दिवशी उपस्थित होते. आरोग्य सुविधा स्टॉल, वैद्यकीय शिबीर आयोजित करण्यात आले होते. कडक पोलीस बंदोबस्त होता तसेच आरोग्य यंत्रणा मुबलक होती. आंगणेवाडी ग्रामस्थ व मंडळाचे पदाधिकाऱ्यांनी समाधान व्यक्त केले.
आकर्षक विद्युत रोषणाई, सेल्फीची भुरळ
मंदिर परिसरातील आकर्षक विद्युत रोषणाई, लेझर किरणाचे दूरवर पडणारे प्रकाशझोत लक्ष वेधून घेत होते, तर मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली होती. मंदिराच्या विद्युत रोषणाईसह आपल्या मोबाईल सेलवर आपली सेल्फी काढताना युवा वर्ग दिसून येत होता. मंदिर परिसरात भव्य सभामंडप, बाजूला रस्त्याच्या बाजूला चलचित्र देखावा लक्ष वेधून घेत होता.
जय भराडी देवीचा घुमला गजर
आंगणेवाडी भराडी देवीच्या यात्रोत्सवात रात्री भक्तांची शिस्तबद्ध गर्दी दिसत होती. जय जय भराडी देवी या मंत्र घोषात रात्री 9 वाजण्याच्या सुमारास देवीला प्रसाद (ताटे) लावण्याच्या धार्मिक कार्यक्रमास सुरुवात झाली. प्रथम देवीच्या मानकऱ्यांची प्रसादाची ताटे देवीच्या प्रांगणात सुहासिनी महिलांनी डोईवर घेत पारंपरिक रीतीरिवाजात मंदिरात प्रवेश केला. ‘जय जय भरडी देवी’ जय जय भरडी देवी या मंत्र घोषात भक्त रममाण झालेले दिसून येत होते. महाप्रसादाच्या कार्यक्रमानंतर प्रतिवर्षाप्रमाणे अनेक भाविकांनी आंगणे कुटुंबीयांच्या घरी महाप्रसाद घेतला. यावेळी भक्तांना दर्शनाची रांग 12 वाजेपर्यंत बंद करण्यात आली होती. यानंतर पुन्हा दर्शन रांगा सुरू करण्यात आल्या.
अतिथींची सेवा आंगणेकरांची प्रथा!
आंगणेवाडी यात्रेत भराडी देवीच्या यात्रेस येणाऱ्या राज्यातील लाखो भाविकांना सुलभ दर्शन व्हावे तसेच रात्री महाप्रसाद प्रत्येक भाविकांना मिळावा यासाठी आंगणेवाडी ग्रामस्थ कटिबद्ध होते.
यात्रेत लाखोंची उलाढाल!
आंगणेवाडी यात्रेत मोठ्या संख्येने चाकरमानी भक्त आले होते. त्यामुळे लाखो रुपयांची उलाढाल झाली. चादर, खेळणी, शेती अवजारे, मिठाई दुकानदार, फनी गेम, मर्यादित असलेले हॉटेल व्यावसायिक, विविध स्टॉलधारक तेजीत होते.