वाहनाच्या उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांकासाठी बनावट संकेतस्थळाद्वारे फसवाफसवी, सायबर पोलिसांकडून बंगळुरूमधून एकाला अटक

जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागामार्फत तीन संस्थांची निवड केलेली असून त्यांचे संकेतस्थळ असताना सायबर भामटय़ांनी नागरिकांची फसवणूक करण्यासाठी एचएसआरपीसाठी बनावट संकेतस्थळ तयार केले होते. हा गैरप्रकार करणाऱ्या आरोपीला दक्षिण प्रादेशिक सायबर पोलिसांनी बंगळुरू येथून पकडून आणले आहे.

वाहनांमुळे होणारे गुन्हे कमी करणे, रस्त्यावर धावणाऱ्या वाहनांची ओळख पटविणे, नंबर प्लेटमध्ये होणारी छेडछाड व बनावटीकरण रोखण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाने सर्व वाहनांना एचएसआरपी बसविण्याचे निर्देश दिले आहेत. त्यानुसार राज्य शासनाने महाराष्ट्रात 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या वाहनांना एचएसआरपी बसविण्याचा निर्णय घेतला असून जुन्या वाहनांना एचएसआरपी बसविण्यासाठी परिवहन विभागामार्फत तीन संस्थांची निवड करण्यात आली आहे. असे असताना  सायबर गुन्हेगारांनी एचएसआरपी बसविण्यासाठी इतर बनावट लिंक तयार केल्याबाबत परिवहन विभागाकडून दक्षिण सायबर पोलीस ठाण्यात तक्रार देण्यात आली होती. याप्रकरणी गुन्हा दाखल करून वरिष्ठ निरीक्षक नंदकुमार गोपाळे यांच्या नेतृत्वाखाली सपोनि रुपाली चौधरी, इशान खरोटे व पथकाने तपास सुरू केला. तांत्रिक तपासात नागरिकांची फसवणूक करण्यासाठी सायबर भामटय़ाने इंडनंबरप्लेट डॉट कॉम हे बनावट संकेतस्थळ बनवले होते. त्या संकेतस्थळाचा तांत्रिक तपास सुरू करून पथकाने बंगळुरूच्या मुथ्यालानगर माथिकेरे येथे राहणाऱ्या विनोद बावळे (57) याला पकडले. त्याचे अन्य कोणी साथीदार आहेत का याचा पोलीस तपास करीत आहेत.