शिक्षिकेच्या घराला आग, बारावीच्या उत्तरपत्रिका खाक; विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला

शिक्षिकेच्या घराला लागलेल्या आगीत बारावीच्या ऑर्गनायझेशन ऑफ कॉमर्स या विषयाच्या उत्तरपत्रिका जळून खाक झाल्याची धक्कादायक घटना विरारच्या नानभाट येथील गंगूबाई अपार्टमेंटमध्ये घडली आहे. शॉर्टसर्किटमुळे लागलेल्या या आगीत अख्खे घर जळाले आहे. या घटनेमुळे ज्यांच्या या उत्तरपत्रिका होत्या त्या विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.

बारावी परीक्षेच्या उत्तरपत्रिका शिक्षकांकडे तपासणीसाठी गेल्या आहेत. या उत्तरपत्रिका कॉलेजमध्येच तपासाव्यात असा नियम आहे. मात्र एका शिक्षिकेने या उत्तरपत्रिका तपासण्यासाठी थेट घरी नेल्या. शिक्षिकेचे कुटुंब बाहेर गेले असताना शॉर्टसर्किटमुळे घराला अचानक आग लागली आणि अख्खे घर आगीच्या भक्ष्यस्थानी पडले. त्यात बारावीच्या उत्तरपत्रिकाही जळून खाक झाल्या. अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेऊन आग विझवली. मात्र घरातील सर्व सामानाचा कोळसा झाला होता. घरातील सदस्य बाहेर असल्यामुळे सुदैवाने कोणतीही जीवितहानी झाली नाही.