![latur hsc exam](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/latur-hsc-exam-696x447.jpg)
लातूर जिल्ह्यातील 100 परीक्षा केंद्रांवर आजपासून इयत्ता बारावीची परीक्षा सुरू झाली असून, एकूण 37062 विद्यार्थी परीक्षा देत आहेत. कॉपीमुक्त परीक्षेसाठी यावर्षी सर्व परीक्षा केंद्रांवर बैठे पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच परीक्षा कामकाजावर संनियंत्रण ठेवण्यासाठी जिल्हा परिषदेकडून येथे स्वतंत्र कंट्रोल रूम स्थापन करण्यात आले आहे.
या कंट्रोल रूममधून जिल्हाधिकारी वर्षा ठाकूर-घुगे यांनी दूरदृश्य प्रणालीद्वारे वलांडी, देवणी, बोरी आणि रेणापूर येथील परीक्षा केंद्रांवर तैनात बैठे पथकांशी संवाद साधला. तसेच कॉपीमुक्त परीक्षा अभियान यशस्वी करण्यासाठी सर्वांनी सतर्क राहून काम करण्याच्या सूचना दिल्या. तसेच शहरातील काही परीक्षा केंद्रांना भेटी देवून जिल्हाधिकारी ठाकूर-घुगे यांनी परीक्षा प्रक्रियेची पाहणी केली.
इयत्ता बारावी परीक्षेसाठी 100 परीक्षा केंद्रांसाठी प्रत्येकी तीन सदस्य असलेली 100 बैठे पथक आणि 90 भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत. यासोबतच परीक्षा केंद्रांमध्ये सीसीटीव्ही लावण्यात आले असून, सीसीटीव्ही फुटेज पाहण्यासाठी स्वतंत्र व्हीवर्स टीम गठीत करण्यात आल्या आहेत.
पोलीस अधीक्षकांकडून परीक्षा केंद्राची पाहणी
सकाळी 10 वाजण्याच्या सुमारास पोलीस अधीक्षक सोमय मुंडे यांनी लातूरमधील विविध परीक्षा केंद्रांना भेटी देऊन पुरविण्यात आलेला बंदोबस्त, तसेच परीक्षा केंद्राची पाहणी केली.
लातूर जिल्ह्यातील अनेक केंद्रांवर आजपासून बारावीची परीक्षा 12 वी च्या परीक्षेला सुरुवात झाली आहे. सदरची परीक्षा कॉपीमुक्त, भयमुक्त व निकोप वातावरणामध्ये सुरळीतपणे पार पाडावी. यासाठी महाराष्ट्र शासन व महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ, तसेच लातूर जिल्हा पोलीस दल प्रयत्नशील आहे. पोलीस अधीक्षकांनी केंद्रावरील पोलीस बंदोबस्त व शिक्षण मंडळाकडून करण्यात आलेल्या नियोजनाची पाहणी करून सूचना दिल्या.
सदर परीक्षा बंदोबस्ताकरिता 100 पोलीस अधिकारी, 205 पोलीस अंमलदार तर 900 पुरुष होमगार्ड आणि 100 महिला होमगार्ड यांना तैनात करण्यात आले आहे.