भावगंधर्व जागवणार ‘विश्वमोहिनी’ लतादीदींच्या हृद्य आठवणी, 29 नोव्हेंबरला विलेपार्ले येथे कार्यक्रम

भावगंधर्व पंडित हृदयनाथ मंगेशकर सध्या लतादीदींवर एक पुस्तक लिहीत आहेत. या पार्श्वभूमीवर लतादीदींच्या सांगीतिक कार्याचा आणि त्याअनुषंगाने येणाऱया खूप वेगळ्या, कधी न ऐकलेल्या आठवणींचा दृक श्राव्य मागोवा घेणारा ‘ते श्री शारदा विश्वमोहिनी लतादीदी’ हा कार्यक्रम मुंबईत आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमात पंडित हृदयनाथ मंगेशकर संगीतकार आणि भाऊ या नात्याने हृद्य प्रवास उलगडतील. त्यांच्यासोबत विभावरी आपटे जोशी आणि मनीषा लताड सहभागी होतील. यानिमित्ताने लतादीदींच्या आठवणींचा अनमोल खजिना रसिकांसमोर खुला होणार असून रसिकांसाठी ही अनोखी पर्वणी आहे. ‘ते श्री शारदा विश्वमोहिनी लतादीदी’ कार्यक्रम 29 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 7 वाजता मास्टर दीनानाथ मंगेशकर नाटय़गृह, विलेपार्ले येथे होईल. कार्यक्रमाच्या देणगी प्रवेशिका www.bookmyshow.com वर उपलब्ध आहेत, असे हृदयेश आर्टस्च्या संयोजकांनी सांगितले.