
जम्मू कश्मीरमधील पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये 26 जणांचा मृत्यू झाला असून, यात एका स्थानिक घोडेस्वाराचा देखील समावेश आहे. या घोडेस्वाराचं नाव सय्यद आदिल हुसेन शाह.. एकीकडे धर्म विचारुन गोळीबार करणाऱ्या दहशतवाद्यांच्या गोळीने याचाही प्राण घेतला. आदिलच्या मृत्यूने त्याच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
एएनआयशी बोलताना, आदिल हुसेन शाह याचे वडील सय्यद हैदर शाह म्हणाले, “माझा मुलगा आमच्या कुटुंबातील एकमेव कमावणारा होता. तो काल पहलगामला काम करण्यासाठी गेला होता आणि दुपारी 3 वाजण्याच्या सुमारास आम्हाला हल्ल्याची माहिती मिळाली. आम्ही त्याला फोन केला, पण त्याचा फोन बंद होता. नंतर, 4.30 वाजता, त्याचा फोन चालू झाला, पण कोणीही उत्तर दिले नाही. आम्ही पोलिस स्टेशनमध्ये धाव घेतली आणि तेव्हाच आम्हाला कळले की तो हल्ल्यात जखमी झाला आहे. माझा मुलगा या दहशतवादी हल्ल्यात मृत झाला असून, तो आमच्या कुटुंबाचा एकमेव कमावता हात होता. आम्हाला त्याच्या मृत्यूसाठी न्याय हवा आहे. तो निर्दोष होता. त्याला का मारण्यात आले? यासाठी जे कोणी जबाबदार असेल त्याला याचे परीणाम भोगावे लागतील.”
आदिलची आई देखील मुलाच्या मृत्यूने खचली असून, त्या म्हणाल्या आता आम्हाला सांभाळणारे दुसरे कोणीही नाही. त्याच्याशिवाय आम्ही काय करू हे आम्हाला माहितही नाही.”
सध्या झालेल्या घटनेमुळे कुटुंब आता या प्रचंड दुःखात असून, सरकारकडे मदतीची याचना करत आहे.