Pimples On Face- मेकअपमुळे तुमच्या चेहऱ्यावर पिंपल्स येतात का? या घरगुती उपायांनी करा पिंपल्सवर मात!

अनेकदा महिला लग्न, पार्टी किंवा कार्यक्रमात जाण्यापूर्वी मेकअप करतात. मेकअप केल्याने चेहरा सुंदर दिसतो. परंतु बऱ्याचदा काही महिलांना अशी समस्या असते की, मेकअप लावताच चेहऱ्यावर मुरुमे येतात. खरंतर, रात्री झोपण्यापूर्वी मेकअप व्यवस्थित न काढल्याने त्वचेचे छिद्र बंद होतात. यामुळे चेहऱ्यावर मुरुमे आणि ब्लॅकहेड्सची समस्या येऊ लागते. याशिवाय, कधीकधी त्वचेला अनुकूल नसलेल्या उत्पादनामुळे देखील मुरुमे येऊ शकतात. तुम्हालाही मेकअप मुरुमांच्या समस्येने त्रास होत असेल तर, काही घरगुती उपायांनी तुम्ही या समस्येपासून मुक्तता मिळवू शकता.

मुरुमांसाठी घरगुती उपाय

मध
मेकअप मुरुमांपासून मुक्त होण्यासाठी मध हा उत्तम पर्याय आहे. मधात अँटी-बॅक्टेरियल, अँटीसेप्टिक आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म आहेत. हे सर्व गुणधर्म त्वचेचे संक्रमण आणि मुरुमे दूर करण्यास उपयुक्त आहेत. यासाठी मुरुमांवर मध लावा. 15 ते 20 मिनिटांनी चेहरा कोमट पाण्याने धुवा. हे नियमितपणे केल्याने, मुरुम नाहीसे होण्यास मदत होते.

कोरफड
कोरफडीचा जेल त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. त्यात अँटी-बॅक्टेरियल आणि अँटी-इंफ्लेमेटरी गुणधर्म असतात. यामुळे मुरुमांपासून मुक्त होण्यास मदत मिळते. तसेच मेकअप काढल्यानंतर चेहऱ्यावर कोरफडीचे जेल लावल्यानंतर, हलक्या हातांनी गोलाकार पद्धतीने किमान ५ मिनिटे मसाज करायला हवा. त्यानंतर १५ मिनिटांनी चेहरा पाण्याने धुवावा.

मुलतानी माती

मुलतानी माती त्वचेवरील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकण्याचे काम करते. हे मुरुम आणि पुरळ काढून टाकते आणि त्वचा चमकदार बनवते. यासाठी २ चमचे मुलतानी माती घ्या. त्यात एक चमचा गुलाबजल घाला आणि चांगले मिसळा. आता ही पेस्ट मुरुमांवर लावा आणि सुकू द्या. १० ते १५ मिनिटांनी चेहरा साध्या पाण्याने धुवा. आठवड्यातून २ ते ३ वेळा अशापद्धतीने मुलतानी मातीच्या वापराने मुरुम जाण्यास मदत होईल.

नारळ तेल
नारळाचे तेल हा सर्वात प्रभावी उपाय मेकअप काढण्यासाठी मानला जातो. यामध्ये दाहक-विरोधी आणि जीवाणूविरोधी गुणधर्म आहेत. हे चेहऱ्यावरील संसर्ग रोखते आणि मुरुमे देखील दूर करते. तसेच यामुळे त्वचा मुलायम राहते आणि ग्लोसुद्धा येतो. रात्री झोपण्यापूर्वी कापसाच्या बॉलच्या मदतीने मुरुमांवर खोबरेल तेल लावावे.

बर्फ
मेकअप केल्यानंतर मुरुमे आल्यावर ती लवकर बरे करण्यासाठी बर्फाचा वापर हा उत्तम मानला जातो. याकरता बर्फाचा तुकडा स्वच्छ सुती कापडात बांधा. नंतर तो तुकडा मुरुम असलेल्या भागावर फिरवावा. त्वचेवर बर्फ चोळल्याने मुरुमांपासून आलेली सूज आणि लालसरपणा कमी व्हायला मदत होते.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)