Makeup Tips- मेकअप काढताना ‘या’ गोष्टींची काळजी न विसरता घ्या!

मेकअप करणं हा मुलींच्या जिव्हाळ्याचा विषय. परंतु मेकअप नुसता करुन चालत नाही तर, मेकअप काढणं ही सुद्धा एक कला आहे. अनेकदा मुली मेकअप करतात, पण तो कसा काढायचा याकडे मात्र दुर्लक्ष केलं जातं. मेकअप नीट न काढल्यामुळे, चेहरा खराब होण्याची दाट शक्यता असते. एखाद्या खास प्रसंगी केलेला मेकअप काढण्यासाठी मेकअप रिमूव्हर किंवा क्लीन्सर सारखे विविध प्रकारचे क्लीन्सर बाजारात उपलब्ध आहेत. परंतु त्यामध्ये अनेक प्रकारची रसायने आढळतात, त्यामुळे त्यांचा दररोज वापर केल्याने त्वचेलाही नुकसान होऊ शकते. तसेच, हे थोडे महाग देखील आहेत. मेकअप काढण्यासाठी तुम्ही काही घरगुती उपाय अवलंब देखील करु शकता. घरी उपलब्ध असलेल्या काही नैसर्गिक गोष्टी त्वचेवरील मेकअप काढून टाकण्यास तसेच त्वचा चमकदार ठेवण्यास मदत करू शकतात.

 

गुलाब पाणी आणि जोजोबा तेल

एक चमचा गुलाबजलात समान प्रमाणात जोजोबा तेल मिसळा. यानंतर ते कापसावर लावा आणि चेहऱ्याला लावावे . यामुळे तुमच्या त्वचेलाही नुकसान होणार नाही. कोरडी त्वचा असलेल्यांसाठी हा पर्याय उत्तम मानला जातो. गुलाबपाणी चेहरा हायड्रेट ठेवण्यास मदत करते आणि जोजोबा तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

 

गुलाब पाणी आणि कोरफड जेल क्लिंझर

गुलाबपाणी आणि कोरफडीचे जेल तेलकट आणि कोरड्या या दोन्ही त्वचेसाठी फायदेशीर आहे. गुलाबपाणी त्वचेला थंडावा देते. तसेच कोरफडीचा जेल त्वचेला मुलायम आणि चमकदार बनवण्यास मदत करतो. 2 चमचे गुलाबजलात 1 चमचा एलोवेरा जेल मिक्स करावे. तुम्हाला हवे असल्यास त्यात 1-2 थेंब खोबरेल तेल देखील घालू शकता. एका भांड्यात गुलाबजल आणि कोरफड जेल चांगले मिक्स करुन घ्यावे. त्यानंतर हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावावे. ओल्या कापडाने किंवा कापसाने स्वच्छ करावे. या उपायाने मेकअप सहजपणे काढण्यास मदत होते.

कच्चे दूध

कच्चे दूध हे एक नैसर्गिक क्लिंजर आहे. हे त्वचेला मॉइश्चरायझ करण्यास आणि मेकअप सहजपणे काढण्यास मदत करते. 1-2 चमचे कच्चे दूध घ्या, कच्च्या दुधात कापसाचा बोळा बुडवावा. नंतर हे मिश्रण हलक्या हातांनी चेहऱ्यावर लावावे आणि मेकअप स्वच्छ करावा. चेहरा पाण्याने धुवावा. हा उपाय कोरडी त्वचा असलेल्यांसाठी खूप फायदेशीर आहे.

 

खोबरेल तेल

मेकअप काढण्यासाठी नारळ तेलाचा देखील वापर केला जातो. यासाठी कापसावर खोबरेल तेल लावा आणि हलक्या हाताने मसाज करताना त्वचेवर लावा. हे मेकअप काढण्यास मदत करू शकते, तसेच नारळ तेल त्वचेतील ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते.

 

(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला अवश्य घ्यावा.)