
सणासुदीला आपल्याकडे हमखास पुरणपोळीचा घाट घातला जातो. मऊसुत पुरणपोळी, दुधाची वाटी आणि पुरणपोळीच्या जोडीला तूप.. साग्रसंगीत असा बेत आपल्याकडे सणासुदीला असते. आपल्याकडे नववर्षाचं स्वागत हे गुड्या उभारून केलं जातं. नववर्ष म्हणजे गोडाधोडाचं जेवण हे ओघानं आलंच. पण हे गोडाधोडाचं जेवण करताना काही आवश्यक तयारी आधी केली तर थकायला कमी होतं. खासकरून पुरणपोळीचा घाट घालायचा असेल तर, काही टिप्स आणि पूर्वतयारी करणे हे खूप गरजेचे आहे. पुरणपोळी म्हणजे साहित्य जमवण्यापासून सुरुवात असते. परंतु कधी कधी सर्व साहित्य असूनही पुरणपोळी काही नीट लाटता येत नाही. किंवा काही जणींच्या हातून तर पुरणपोळी सतत फुटत राहते. अशावेळी पुरणपोळी करण्याआधी काही टिप्स आपण विचारात घ्यायला हव्यात.
पुरणपोळी करण्यासाठी महत्त्वाच्या टिप्स
पुरणपोळी करण्यासाठी सर्वात महत्त्वाचे म्हणजे तुम्ही कोणत्या पिठाच्या पुरणपोळ्या करणार आहात. मैदा असो किंवा गव्हाच्या पिठाच्या पोळ्या असो. सर्वात आधी तुम्ही पीठ व्यवस्थित चाळून घ्या.
पुरणपोळीचे पीठ व्यवस्थित चाळून घेतल्यानंतरच, तेल लावून हे पीठ चांगले तिंबवून भिजवावे.
पुरणपोळीसाठी चणाडाळ ही किमान एकतास आधी भिजवून ठेवावी. चणाडाळ व्यवस्थित भिजल्यावर पुरणपोळी ही मऊ लुसलुशीत होते.
खमंग आणि लुसलुशीत पुरणपोळी बनविण्यासाठी गूळाचा वापर आणि साखरेचा वापर समप्रमाणातच करायला हवा.
पुरणपोळीची डाळ किमान कुकरमध्ये किमान चार शिट्ट्यांमध्ये शिजवून घ्यायला हवी.
पोळी करताना सारण घट्ट झाल्यास हलक्या हाताने दुध शिंपडून सारण ओलसर करुन घ्यावे.