
उन्हामुळे त्वचा काळवंडते, अशावेळी नेमका उपाय काय करायचा असा प्रश्न पडतो. उन्हाळ्याच्या सीझनमध्ये प्रदूषण, धूळ, माती, घाण आणि इतर अनेक कारणांमुळे आपल्या त्वचेचे खूप नुकसान होते. चेहरा थंड ठेवण्यासाठी कोणते घरगुती उपाय करावेत असा प्रश्न तुम्हाला पडला असेल तर, यावर उत्तर आहे द्राक्षे. उन्हाळ्यात त्वचेला थंडावा देण्यासाठी द्राक्षे हा उत्तम पर्याय आहे. द्राक्षांपासून नानाविध फेसपॅक बनवून उन्हाळ्यामध्ये आपण चेहरा सुंदर ठेवू शकतो.

द्राक्षे आणि पुदीना फेस पॅक
द्राक्षे बारीक करून त्यात पुदिन्याची पाने मिसळा. तुम्हाला हवे असल्यास त्यात लिंबाच्या रसाचे काही थेंबही टाकू शकता. हे तिन्ही चांगले मिसळा. हा फेस पॅक चेहऱ्यावर लावा आणि 10 मिनिटे तसाच राहू द्या. त्यानंतर कोमट पाण्याने चेहरा धुवा. यानंतर बर्फाचा तुकडा गुलाब पाण्यात बुडवून संपूर्ण चेहऱ्यावर चोळा. हा पॅक केवळ चेहऱ्यावरच चमक आणणार नाही तर तुमची त्वचा तेलकट असेल तर ते तुमच्यासाठी फायदेशीर ठरेल.
द्राक्षे आणि गाजर फेस पॅक
द्राक्षे बारीक करा म्हणजे त्याची चांगली पेस्ट तयार करा. या पेस्टमध्ये एक चमचा क्रीम घाला. तसेच एक चमचा तांदळाचे पीठ आणि एक चमचा गाजराचा रस एकत्र करा. हे सर्व चांगले मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावून सोडा. ते सुकल्यावर कोमट पाण्याने धुवावे. हा मास्क वापरल्याने त्वचा घट्ट होते आणि चमकही येते.
तेलकट त्वचेसाठी द्राक्षांचा फेस पॅक
एका लहान भांड्यात मुलतानी माती घ्या. त्यात काही थेंब लिंबाचा रस आणि काही थेंब गुलाबपाणी घाला. यानंतर त्यात द्राक्षाची पेस्ट चांगली मिसळा. हा पॅक चेहऱ्यावर लावा आणि २० मिनिटे तसाच राहू द्या. ते सुकल्यावर सामान्य पाण्याने चेहरा धुवा.
(कोणतेही उपाय करण्याआधी तज्ज्ञांचा सल्ला घेणे आवश्यक आहे.)