![neehar - 2025-02-13T102405.491](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-13T102405.491-696x447.jpg)
![](https://www.saamana.com/wp-content/uploads/2025/02/neehar-2025-02-13T102418.620.jpg)
फॅशनमध्ये दररोज नानाविध बदल होत असतात. त्यामुळेच आपण अपडेट राहणे हे खूप गरजेचे आहे. अलीकडच्या काळात साडी नेसण्याचा ट्रेंड खूप वाढला आहे. खासकरून अनेक कार्यालयांमध्ये काॅर्पोरेट मीटिंग्जमध्ये साडी घालण्यास महिलावर्ग पसंत करत आहे. तुम्हालाही साडीत स्लिम आणि स्टायलिश दिसायचं असेल तर, आम्ही तुम्हाला काही टिप्स देत आहोत. या टिप्समुळे तुम्हाला परफेक्ट लूक मिळू शकेल. साडीमध्ये परफेक्ट लूक मिळवण्यासाठी तुम्ही शेपवेअरचा वापर करू शकता. त्यामुळे तुम्ही स्लिम आणि उंच देखील दिसाल. फिटिंग पेटीकोट असणे आवश्यक आहे. महिला बर्याचदा फिटिंग पेटकोटकडे दुर्लक्ष करतात. परंतु योग्य फिटिंगच्या पेटीकोटमध्ये आपण बारीक आणि उंच दिसतो. त्यामुळे पेटीकोटकडे लक्ष देणे फार गरजेचे आहे.
पेटीकोटचा रंगही योग्य असावा. म्हणजे तुमच्या साडीचा रंग गडद हिरवा असेल तर त्यासह फिकट हिरवा निवडण्याची चूक करू नका. साडीनुसार पेटीकोटचा रंग निवडा, अन्यथा तुमचा लुक पूर्णपणे बिघडेल. तसेच शिफॉन, जॉर्जेट, ऑर्गनझा फॅब्रिकची साडी घातली असेल तर पेटीकोटच्या रंगावर जास्त लक्ष देण्याची गरज नाही. साडीमध्ये परफेक्ट लुक मिळवण्यासाठी पेटीकोट फॅब्रिकवर विशेष लक्ष द्या. जर तुमची साडी हलकी असेल तर पेटीकोट फॅब्रिक भारी असायलाच हवा. तुम्ही भारी साडी नेसणार असाल तर, पेटीकोटवर फार खर्च करण्याची गरज नाही. अलीकडे बाजारात डिझायनर पेटीकोट्सचा ट्रेंड आलेला आहे. या पेटीकोट्समध्ये थ्रेड वर्क आणि भरतकाम यांचा अनोखा संगम असतो. त्यामुळे तुमची साडी नेसण्याची पद्धतही बदलते. खासकरून नेट, शिफॉन या साड्यांवर डिझायनर पेटीकोट वापरावेत.