Mango Shopping- रासायनिक प्रक्रिया केलेला आंबा कसा ओळखाल? खरेदीआधी वाचा…

उन्हाळा आल्यावर फळांचा राजा म्हणजेच आंबा बाजारात ठाण मांडून बसतो. परंतु बरेचदा घरी आंबा आणल्यावर, तो आतून सडका निघतो. बाहेरून चांगलं दिसणारं फळ आतून मात्र किडलेले असते. अशावेळी ओळखायचं की या आंब्यावर रसायनांचा अतिवापर झालेला आहे. रसायनांचा अतिवापर आंब्यासाठी घातक असतो. त्यामुळे आंबा किडण्यास सुरुवात होते.

 

उन्हाळ्यात बाजारामध्ये तोतापुरी, हापूस, लंगडा, आम्रपाली, केसर, गावरान, खोबऱ्या, दशहरी असे विविध आंबे आपल्याला बाजारात दिसतात. आंबा हे फळ फळांचा राजा तर आहेच. पण आंबा खाण्याचे फायदेही अगणित आहेत. सीझनमधला आंबा खाणं म्हणजे एक अनोखा आनंद असतो. आंबा नैसर्गिकरित्या पिकला आहे की रसायनांचा वापर करून पिकवला आहे हे ओळखणे खूप महत्वाचे आहे. सध्याच्या घडीला अन्नपदार्थांमध्ये भेसळ ही खूप सर्वसामान्य बाब झाली आहे. आंब्यामध्येही पिकण्यासाठी रसायनांचा वापर फार मोठ्या प्रमाणात केला जातो.

 

रासायनिक आणि नैसर्गिक प्रक्रियेने पिकवलेले आंबे कसे ओळखायचे ते जाणून घ्या.

आंबा विकत घेताना त्याच्या सालीवरुन ओळखावा. आंबा रसायनांचा वापर करून पिकवला असेल तर त्याच्या सालीला चमक येऊ शकते किंवा त्यावर पांढऱ्या-राखाडी पावडरचा थर येऊ शकतो.

आंब्याच्या सालीचा रंग जातीनुसार बदलतो, परंतु रसायनांनी पिकवलेल्या बहुतेक आंब्यांची साल पूर्णपणे पिवळी किंवा पूर्णपणे नारिंगी असते. तर नैसर्गिकरित्या पिकलेला आंबा पूर्णपणे सारख्या रंगाचा नसतो. नैसर्गिकरित्या पिकवलेल्या आंब्यावर काही ठिकाणी तुम्हाला कच्च्या त्वचेचे डाग दिसतील किंवा संपूर्ण सालीचा रंग सारखा दिसत नाही.

mango

नैसर्गिकरित्या पिकलेल्या आंब्याचा सुगंध आणि गोडवा तोंडात विरघळतो, तर रासायनिक पद्धतीने पिकवलेल्या आंब्यांची चव तुरट असू शकते.

आंबे खरेदी करताना, तुम्ही दुकानदाराला ते कापून दाखवायला सांगू शकता किंवा तुम्ही ते घरी आणून कापून आंब्याचा रंग आतून कसा आहे ते पाहू शकता. रसायनांचा वापर करून पिकवलेल्या आंब्यांचा रंग काही ठिकाणी हलका पिवळा असतो तर काही ठिकाणी गडद पिवळा असतो.